काँग्रेसही उतरणार रिंगणात?
By admin | Published: March 31, 2017 05:41 AM2017-03-31T05:41:57+5:302017-03-31T05:41:57+5:30
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणी
कल्याण : डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणी सुरू केली असताना आता काँग्रेसनेदेखील ही निवडणूक लढवावी की नाही, याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागितले आहे. भाजपातर्फे साई शेलार यांचे नाव निश्चित झाले आहे. ते रविवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. साई हे दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांचे सुपुत्र आहेत.
केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४६ चे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे ४ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या प्रभागात १९ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत एक अर्जाचे वितरण झाले असले तरी एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही.
भाजपाचे उमेदवार म्हणून शेलार कुटुंबातील साई यांचे नाव निश्चित झाल्याचे पक्षाचे गटनेते वरुण पाटील यांनी सांगितले. दिवंगत झालेल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील व्यक्तीच निवडणुकीला उभी राहत असेल तर त्याच्याविरोधात आम्ही उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका शिवसेना आणि मनसेने घेतली आहे. परंतु, राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे. उद्या शुक्रवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली होती. त्या वेळी खंबाळपाड्याची जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली होती. परंतु, निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी केली. शेलार कुटुंबाने इतर पक्षांकडे पाठिंबा मिळावा, यादृष्टीने प्रस्ताव देत चर्चाही केली आहे. मात्र, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागली आहे. त्यांचेही लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ पोटनिवडणुकीची परतफेड?
काँग्रेसचे उपमहापौर पंडित भोईर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि मनसेने उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, भाजपाने त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. याची परतफेड करण्याची वेळ आल्याचा सूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
त्यादृष्टीने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर निर्णय सोपवल्याचे त्यांनी सांगितले.