एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आज काँग्रेस आंदोलन करणार; ठाण्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:20 AM2022-08-21T08:20:40+5:302022-08-21T08:25:01+5:30
उद्धव ठाकरे यांनी देखील आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसही चांगलाच आक्रमक झाला आहे.
ठाणे/मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो - ३ च्या कारशेडच्या कामाला आरेमध्ये सुरुवात करता यावी म्हणून राज्य सरकारने आरेमधील कामावरील बंदी उठविली असतानाच दुसरीकडे अनेक संघटनांकडून या प्रकल्पाला विरोध होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसही चांगलाच आक्रमक झाला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरणप्रेमींसोबत काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात ठाण्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आरेमध्ये दर रविवारी पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन करण्यात येतंय. आज देखील आरे वाचवा मोहिमेतंर्गत आरेत मेट्रो कारशेड विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत आरेमधील कारशेडबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरेमधील होणारा विरोध हा काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा आम्ही सन्मान करतो. मात्र २५ टक्के हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. झाडे कापलेली आहेत. आता अजून झाडे कापण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आता जर काम सुरु केले तर, वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
आरे येथे कारशेड उभारणे हेच मुंबईकरांच्या हिताचे आहे. जिथे कारशेड २५ टक्के तयार झाले आहे तिथेच ते १०० टक्के तयार व्हावे, कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे. आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कारशेड हा अहंकाराचा विषय नाही तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचे कारण नव्हते. शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.