काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनापूर्वीच ताब्यात
By Admin | Published: June 10, 2017 01:04 AM2017-06-10T01:04:55+5:302017-06-10T01:04:55+5:30
मध्य प्रदेश, मन्सोर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने देशभरात आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कल्याण रेल्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मध्य प्रदेश, मन्सोर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने देशभरात आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कल्याण रेल्वे स्थानकात ‘ रेल रोको आंदोलना’च्या तयारीत असणाऱ्या शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी भल्या पहाटे आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे.
मध्य प्रदेश येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास गेलेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने भाजपा सरकारविरोधात
देशभरात आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी सकाळी कल्याण स्थानकात रेल रोको आंदोलन केले जाणार होते. मात्र, या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यात युवक जिल्हाध्यक्ष राहुल शर्मा, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, सुखी सिंग, मनीष देसले, संजय पाचगरे, जयदीप सिंग यांना ताब्यात घेतले.
सरकार आणि पोलिसांच्या या कारवाईचा आम्ही निषेध केला आहे. भाजपा सरकार पोलीस बळाचा वापर करत काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रवक्ता ब्रीजकिशोर दत्त यांनी केला. भाजपा लोकशाहीची हत्या करत आहे. सरकारच्या दबावाला कार्यकर्ते बळी पडणार नाहीत, असेही दत्त म्हणाले.