काँग्रेसचे इच्छुक उतावीळ, महाविकास आघाडीची प्रतीक्षा न करताच प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 01:01 AM2020-03-05T01:01:07+5:302020-03-05T01:01:17+5:30
महाविकास आघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा न करताच काँग्रेसच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांत बॅनरबाजी सुरू केली आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेची आरक्षण सोडत झाल्यावर लागलीच अनेक उमेदवारांनी आपापले प्रभाग निश्चित केले आहेत. पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची चर्चा अद्याप झालेली नाही. महाविकास आघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा न करताच काँग्रेसच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांत बॅनरबाजी सुरू केली आहे. तर, काहींनी मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात महाविकास आघाडी आल्यावर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकास आघाडी करून निवडणुका लढविण्यावर एकमत झाले होते. या महाविकास आघाडीनंतर अंबरनाथ पालिकेची निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठीही वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चर्चेत आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय हा फॉर्म्युला अंतिम स्वरूप घेणार नाही. त्यातच अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत झाल्यावर लागलीच अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागांत कामही सुरू केले आहे. शिवसेनेच्या वतीने उमेदवारनिश्चिती पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत.
शिवसेनेत अनेक इच्छुक रिंगणात असल्याने त्या ठिकाणी मोठी कसरत होणार आहे. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातच ज्या प्रभागात एकच इच्छुक उमेदवार रिंगणात आहे, त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराने आघाडीची प्रतीक्षा न करताच थेट आपल्या प्रचारास सुुरुवातही केली आहे. अंबरनाथ पूर्व भागात काँग्रेसला कमकुवत समजले जात होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पूर्वभागातही अनेक दिग्गज कार्यकर्ते उमेदवारीसाठी स्पर्धा करताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीची प्रतीक्षा न करता काँग्रेसच्या अनेकांनी आपल्या प्रभागात बॅनरबाजी करून भावी नगरसेवक, भाजी नगरसेविका अशा अशयाचे बॅनर लावले आहेत. तर, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीदेखील काही उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या आहेत. स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन अनेक उमेदवारांना प्रभागात काम करण्याच्या सूचना दिल्याने महाविकास आघाडीचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसचे आठ नगरसेवक असून ८ चे १८ करण्याचा प्रयत्न स्थानिक नेते करत आहेत. शहरात काँग्रेसची ताकद वाढावी, यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा काँग्रेस देणार की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला रोखणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मात्र, स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील अनेक प्रभागांत काँग्रेसचे उमेदवार प्रचारात मग्नही झाले आहेत. तर, शिवसेना उमेदवाराची निश्चिती ही विलंबाने होणार असल्याने त्यांना प्रचारासाठी कमी अवधी मिळणार आहे. आचारसंहिता लागण्यास अद्याप महिना शिल्लक असल्याने आचारसंहितेच्या आधीच प्रचार करून काँग्रेस मोकळी झाली आहे. त्यामुळे हा विषय चर्चेला जात आहे.
>ठरावीक उमेदवारांना मिळणार प्रचाराला वेळ
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीही अशाच प्रकारे प्रचारात व्यस्त झाली आहे. राष्ट्रवादीने आपल्या मोजक्याच प्रभागांवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्या पक्षातील कार्यकर्त्यांनीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांनीही महाविकास आघाडीची प्रतीक्षा न करताच प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे सत्तेपासून दूर असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या ठरावीक उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीचा अवधी मिळणार, हे निश्चित झाले आहे.