कर्मचारी हक्कासाठी काँग्रेस सरसावली
By admin | Published: April 29, 2017 01:32 AM2017-04-29T01:32:08+5:302017-04-29T01:32:08+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेत बुधवारी काँग्रेसची नवीन कर्मचारी संघटना स्थापन झाली. या संघटनेसह पालिकेत सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांसाठी एकूण सहा संघटना झाल्या आहेत.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत बुधवारी काँग्रेसची नवीन कर्मचारी संघटना स्थापन झाली. या संघटनेसह पालिकेत सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांसाठी एकूण सहा संघटना झाल्या आहेत.
माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या हस्ते नवीन संघटनेचा पाया रोवण्यात आला. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या (इंटक) बॅनरखाली सुरू केलेली नवीन संघटना कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले. यानंतर, आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासोबत हुसेन यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचण्यात आला. त्याचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. या नवीन संघटनेसह पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एकूण सहा संघटना कार्यरत झाल्या आहेत. त्यात इंटकसह माजी आ. विवेक पंडित यांची श्रमजीवी संघटना, सेनेची कामगार सेना, मनसेची कामगार सेना, रयत राज्य कामगार संघटना व आमदार नरेंद्र मेहताप्रणीत श्रमिक जनरल कामगार संघटनेचा समावेश आहे. रयत राज्य कामगार संघटना नवीन नेतृत्वाच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यातील सभासद कामगार सेना किंवा श्रमजीवी संघटनेत विलीन होण्याचे संकेत दिले जात आहेत. संघटना बदलाचे वारे वाहत असतानाच पालिकेत इंटकचा शिरकाव झाला आहे. (प्रतिनिधी)