वाडा येथे काँग्रेसची उग्र निदर्शने
By admin | Published: May 24, 2017 12:47 AM2017-05-24T00:47:50+5:302017-05-24T00:47:50+5:30
सत्तेवर येऊन तीन वर्षे होत आली तरी जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती मोदी सरकारला व फडणवीस सरकारला करता न आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी येथे जोरदार निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : सत्तेवर येऊन तीन वर्षे होत आली तरी जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती मोदी सरकारला व फडणवीस सरकारला करता न आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी येथे जोरदार निदर्शने केली.
महागाईच्या वणव्यात सामान्य जनता होरपळत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसागणिक वाढत आहेत तर सीमेवर रोज जवान शहीद होत असल्याने सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरल्याच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष केदार काळे यांच्या नेतृत्वाखाली वाड्यातील खंडेश्वरी नाक्यावर जोरदार निदर्शने केली.
केंद्रात सत्तेवर येतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य मतदारांना भुलविण्यासाठी प्रचंड आश्वासने दिलीत. सरकारला ३ वर्ष पूर्ण होत आहेत मात्र जनतेच्या हिताच्या कोणत्याही योजना हे सरकार राबवू शकलेले नाही. कॉंग्रेस सरकारने केलेल्या योजनांची उद्घाटने करून त्याचे श्रेय लाटत आहे. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते ते झाले का? असा सवाल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केला. देशाच्या सीमेवर रोजच जवान शहीद होत असतांना एकाच्या बदल्यात दहा मुंडकी आणण्याची भाषा करणारे पंतप्रधान मोदी आता काय करीत आहेत अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतात, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा करणारे आता मूग गिळून बसलेत मद्य विक्रीतील घटलेला महसूल भरून काढण्यासाठी पेट्रोल डीझेलची दरवाढ करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम या सरकारने केल्याने येत्या निवडणुकीत जनताच या सरकारला पायउतार करेल असे सांगितले. आगामी काळात भाजप सरकारविरोधात कॉंग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, धांगे, कैलास पाटील, डॉ. विकास पाटील, लोकेश पाटील, राजू पातकर, जितेश पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदाराना दिले.