हाजुरीमध्ये क्लस्टरसाठी ९५ टक्के रहिवाशांची संमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:37 AM2019-01-31T00:37:02+5:302019-01-31T00:37:18+5:30
सर्व्हे होणारच पालिकेने केले स्पष्ट; विरोधकांना वगळणार
ठाणे : ठाण्यात क्लस्टरची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नागरिकांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी पालिकेचे एकीकडे प्रयत्न असताना हाजुरीमध्ये मात्र या योजनेला सात ते आठ नागरिकांनी विरोध दर्शवल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सरकारी गावठाण परिसर असलेल्या या परिसरात या योजनेसाठी ९५ टक्के नागरिकांनी संमती दर्शवल्याने ज्या सात ते आठ नागरिकांचा या योजनेला विरोध आहे, त्यांना वगळून उर्वरित घरांचा सर्व्हे होणार असल्याचे पालिका प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले.
क्लस्टरअंतर्गत सद्य:स्थितीत असलेल्या बांधकामांची अचूक माहिती प्राप्त व्हावी, यासाठी जीआयएस प्रणाली, लेझर तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या लॅडर तंत्रज्ञान तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येणार आहे. यामुळे अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हाजुरी येथे अशा प्रकारचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारी सकाळी सर्व्हेसाठी ठाणे महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने सर्व्हेचे काम सुरू केल्यानंतर त्याला काही नागरिकांनी विरोध करून सीमांकन झाल्याशिवाय तो करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन तो होऊ दिला नाही.
हाजुरी येथील क्लस्टर योजनेसाठी मात्र ९० ते ९५ टक्के नागरिकांनी संमती दर्शवली असून केवळ सात ते आठ नागरिकांचा या योजनेला विरोध असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. विरोध असलेल्या या सर्व मंडळींनी पालिका अधिकाºयांची भेट घेतली असून ज्यांचा विरोध असेल, त्यांचा सर्व्हे होणार नाही. मात्र, ९५ टक्के नागरिकांनी या सर्व्हेसाठी आपली संमती दर्शवली असल्याने त्यांचा सर्व्हे होणार असून नियुक्त केलेल्या एजन्सीला तशा प्रकारचे आदेशपत्रही दिल्याचे पालिकेचे अधिकारी शैलेंद्र भेंडाळे यांनी स्पष्ट केले.
या ठिकाणी इमारती आणि सुमारे १२०० पेक्षा अधिक झोपड्यांचा परिसर आहे. यामध्ये काही धोकादायक इमारतींचादेखील समावेश आहे. हा सर्व भाग पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येत असून क्लस्टरसाठी त्यांनीदेखील आधीपासून पुढाकार घेतला आहे. ही योजना या ठिकाणी यशस्वी झाल्यास सर्व नागरिकांना सुरक्षित आणि हक्काचा निवारा मिळणार असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.