जवानाच्या अटकेस आसाम रायफलची संमती
By admin | Published: April 15, 2017 01:57 AM2017-04-15T01:57:08+5:302017-04-15T01:57:08+5:30
सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी धाकलू पाटील याच्या अटकेस आसाम रायफल रेजिमेंटने संमती दिली आहे. त्यामुळे या बहुचर्चित घोटाळ्यातील महत्त्वाचा आरोपी
ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी धाकलू पाटील याच्या अटकेस आसाम रायफल रेजिमेंटने संमती दिली आहे. त्यामुळे या बहुचर्चित घोटाळ्यातील महत्त्वाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून, तपासादरम्यान धाकलू पाटील या आणखी एक जवानाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. तो आसाम रायफल रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. त्याला ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू करताच त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेसाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या.
यासंदर्भात पोलिसांनी आसाम रायफल रेजिमेंटशी पत्रव्यवहार करून त्याला पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याच्या सूचना देण्याची विनंतीही केली होती. ठाणे पोलिसांच्या पत्रव्यवहारास आसाम रायफल रेजिमेंटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
चौकशीसाठी धाकलू पाटीलला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास रेजिमेंटने संमती दिली आहे.
तो १५ एप्रिलपर्यंत रजेवर असून त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे विशेष पथक रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)