भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश
By नितीन पंडित | Published: September 1, 2023 05:42 PM2023-09-01T17:42:29+5:302023-09-01T17:42:59+5:30
भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचे सवंर्धन करण्याबरोबरच सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांवरून राज्य सरोवर संवर्धन विकास योजनेतून तलावांच्या विकासकामांना लवकरच सुरूवात होणार आहे.यापूर्वीच भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
राज्याच्या पर्यावरण विभागाकडून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन,प्रदूषण कमी करण्याबरोबर तलाव संवर्धन करण्यासाठी गावांमधील तलावांचा समावेश केला जातो.त्यानुसार तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच परिसरात झाडे लावणे, सोलार पथदिवे, बेंचेस, निर्माल्यकलश बसविण्यात येतात.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचा राज्य सरोवर संवर्धन योजनेत समावेश करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार कल्याण तालुक्यातील उतणे चिंचवली येथील उतणे तलावासाठी दोन कोटी ८८ लाखांचा प्रस्ताव, मुरबाड तालुक्यातील तळवली-बारगाव तलावासाठी दोन कोटी ४४ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील धामणगाव तलावासाठी ३ कोटी ९७ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वडपे तलावासाठी ४ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वाशेरे तलावासाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि भिवंडी तालुक्यातील कोनगावातील कोन तलावासाठी पाच कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
तसेच या तलावांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधीही तातडीने वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे या तलावांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. या कामांबरोबरच बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव तलावासाठी दोन कोटी ३४ लाख, जुवेली गावासाठी दोन कोटी ८५ आणि कात्रप गावासाठी ४ कोटी ५३ यासाठी नगरपालिकेला १० कोटी निधी मंजूर केलेला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वऱ्हाळदेवी तलावासह आणखी सहा तलावांच्या संवर्धनासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.