शहरी पक्ष्यांचे संवर्धन करा, पक्षी निरीक्षणाची संधी, डोंबिवली बर्ड रेसवर सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:35 AM2017-11-23T02:35:57+5:302017-11-23T02:36:09+5:30
ठाण्यात रंगणा-या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली असून या संमेलनात होणा-या चर्चासत्राला सादरीकरणाचीही जोड असेल.
ठाणे : ठाण्यात रंगणा-या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली असून या संमेलनात होणा-या चर्चासत्राला सादरीकरणाचीही जोड असेल. यात शहरी भागांतील पक्षी, त्यांचे संवर्धन आणि त्यात स्थानिकांचा सहभाग या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चासत्रात शास्त्रज्ञ, संशोधक
आणि हौशी पक्षिमित्रांचा सहभाग असेल.
होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्यातर्फे हे संमेलन शनिवार, २५ आणि रविवार, २६ नोव्हेंबरला गडकरी रंगायतनमध्ये पार पडेल. या संमेलनात ठाणे महापालिका आणि मुंबईच्या मन्ग्रोव्ह सेलचा महत्त्वाचा सहभाग आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पक्षिमित्र आणि निसर्ग अभ्यासक दत्ताजी उगावकर भूषविणार आहेत. या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र ‘नागरी परिसरातील पक्षी आणि त्यांचा जीवनक्रम’ हे आहे. २५ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वा. महापौर मीनाक्षी शिंदे, संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर, विशेष अतिथी उल्हास राणे, आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. सकाळी १०.३० वा. संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर यांचे भाषण होईल. सकाळी ११ वा. संमेलनाचे विशेष अतिथी निसर्गतज्ज्ञ उल्हास राणे हे शहरी भागांतील पक्ष्यांच्या संवर्धनातील समस्यांवर मनोगत व्यक्त करीत सादरीकरण करतील. सकाळी ११.४० वा. बीएनएचएसचे डॉ. दीपक आपटे हे भारतातील गिधाडांच्या संवर्धनाविषयी माहिती देतील. दुपारी १२.३० वाजल्यापासून टेक्निकल सत्रांना सुरूवात होईल. त्याची सुरूवात पक्ष्यांच्या स्थलांतरावर असेल. त्यात दुपारी १२.३५ वा. बीएनएचएसचे शास्त्रज्ञ डॉ. साथीयासेल्वम हे भारतातून उडत दुसºया देशात जाणाºया पक्ष्यांची इत्यंभूत माहिती देतील.
ठाणे खाडीकिनारी आढळणाºया पक्ष्यांच्या अधिवासाच्या सत्रात दुपारी २. ३५ वा. खारफुटी विभागाचे मुख्य वनसंरक्षक वासुदेवन एन. हे मन्ग्रोव्ह सेलद्वारे ठाणे खाडीकिनाºयात संवर्धनाचे काम कसे सुरू आहे, याची माहिती देतील. दुपारी ३.३० वा. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञ तुहीना कट्टी या पक्षी स्थलांतराच्या अभ्यासासाठी बर्ड रिंगिंगचा उपयोग कसा होतो, याची निरीक्षणे मांडतील.
दुपारी ४.२० वा. ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे छोट्या तलावांच्या मदतीने पक्षीसंवर्धन कसे करता येईल, ते सांगतील. सायंकाळी ५.३० वा. ते पक्षी आणि मानव सहवास यांच्याबद्दलची आपली निरीक्षणे आणि अनुभव यावर बोलतील. रविवारी सकाळी ६.३० वा. ठाणे पूर्व येथील खाडीकिनारी पक्षी निरीक्षण केले जाईल. सकाळी ११ वा. अमुर फाल्कन या ससाण्याच्या जातीच्या संवर्धनाविषयी डॉ. दीपक आपटे संशोधन सादर करतील. ११.३० वा. शहरी पक्ष्यांवर आधारित सत्र होईल. दुपारी १२.२५ वा. शास्त्रज्ञ डॉ. गोल्डीन कॉड्रोज हे किनारपट्टीवरील पक्ष्यांच्या संवर्धनात स्थानिकांचा सहभाग याबाबत सांगतील.
पक्षी आणि आपण या विषयावरील सत्रात दुपारी बीएनएचएसचे शास्त्रज्ञ डॉ. राजू कसंबे हे पाणथळ जागांमुळे पक्षी संवर्धन कसे झाले आणि त्यात स्थानिकांचा सहभाग यावर सादरीकरण करतील.
>या संमेलनात हौशी पक्षिमित्रांचेही सादरीकरण होणार आहे. त्यात ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणाºया सीमा राजशिर्के यांचे खिडकीतून दिसणाºया पक्ष्यांवरील सादरीकरण हा कुतुहलाचा विषय असेल. सर्वसामान्य गृहिणीने निसर्गाशी नाते कसे जोडले याचा उलगडा यातून होईल. तसेच, शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असलेल्या डोंबिवली बर्ड रेसवरही सादरीकरण होणार आहे.