मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट- जितेंद्र आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 09:07 AM2023-06-13T09:07:05+5:302023-06-13T09:07:15+5:30
मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: मोबाइल गेमच्या आडून ४०० मुलांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या दाखवून विकासाच्या वाटेवर चाललेल्या मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मुंब्रा शहराची बदनामी केल्याच्या निषेधार्थ सोमवारी संध्याकाळी येथील रेल्वे स्थानक ते पोलिस ठाण्याजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान रॅली काढण्यात आली. यात मोठ्या प्रमाणावर सर्वधर्मीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
बदनामीच्या कटाचे दूरगामी परिणाम येथील विकासावर तसेच गुंतवणुकीवर होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
ज्या मुलांचे धर्मांतर करण्यात आले, त्यांची नावे जाहीर करा; अन्यथा मुंब्रा शहराची माफी मागा, अशी मागणीही त्यांनी केली. मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.