राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घाबरविण्याचा कट, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 11:14 AM2023-02-03T11:14:34+5:302023-02-03T11:20:57+5:30
Jitendra Awad: माझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून मला तुरुंगात डांबण्याचा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
ठाणे : माझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून मला तुरुंगात डांबण्याचा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. परंतु आता लढाईला उतरल्यावर परिणामांची काळजी करायची नसते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आव्हाड बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखविले होते. मात्र, हे वृत्त चुकीचे असून मी शिंदे यांना नाही तर नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मला अटक करून ३५४ कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, तेव्हाच त्यांना मी शेवटचा भेटलो होतो. आता कोणताही गुन्हा दाखल केला तर त्यासाठी माझी मानसिक तयारी आहे. रणांगणामध्ये उतरल्यावर परिणामांची पर्वा करायची नसते, असे ते म्हणाले. ज्याला जिथे जायचे असेल जाऊ द्या आणि शहराचा विकास जनतेच्या समोरच आहे. यापूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आमदारकी तर, उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे पद देण्याबाबत विचारणा केली होती; पण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे सांगत या संधी नाकारल्याचा दावा त्यांनी केला.
‘नजीब मुल्ला पक्ष सोडणार नाहीत’
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी कुठेही प्रतिक्रिया दिलेली नसतानाही त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मुल्ला हे पक्ष सोडणार नाहीत, हे मी सुरुवातीपासूनच सांगत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मुल्ला पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले आहे. मुल्ला हे दिल्लीत बँकेच्या बैठकीला गेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला मुल्ला उपस्थित नव्हते, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.