हवालदाराला फरफटत नेणा-या मोटारचालकास अटक, काचा फोडून काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 11:07 PM2017-09-13T23:07:46+5:302017-09-13T23:08:06+5:30
भरधाव वेगाने जाणा-या मोटारीचा पाठलाग करणारे हवालदार रेवननाथ शेकडे (२८) यांना मोटार चालकाने तब्बल पाच किलोमीटर फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री नितिन कंपनी येथे घडली.
ठाणे, दि. 13 - भरधाव वेगाने जाणा-या मोटारीचा पाठलाग करणारे हवालदार रेवननाथ शेकडे (२८) यांना मोटार चालकाने तब्बल पाच किलोमीटर फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री नितिन कंपनी येथे घडली. या घटनेत शेकडे यांच्या हातापायाला गंभीर इजा झाली. नागरिकांच्या मदतीने मोटारचालक नवीन रायबगी (२९) याला अटक करण्यात आली.
नाशिक ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक वॅगनार मोटार भरधाव वेगाने जात असल्याची माहिती नौपाडा सीआर (नियंत्रण कक्ष व्हॅन) मोबाईलला मिळाली. ही माहिती मिळताच रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नितिन कंपनी येथील पोलीस हवालदार शेकडे यांच्या पथकाने तिचा पाठलाग सुरु केला. तिला तीन हात नाक्याजवळील गुरुद्वाराजवळ त्यांनी अडविले. तेंव्हा वॅगनार चालक रायबगी याने शेकडे यांना जोरदार धडक दिली. शेकडे वॅगनारच्या बोनेटवर पडले. गाडीच्या वायपरला त्यांनी पकडून ठेवले. तशाच अवस्थेत रायबगीने वॅगनार कोपरी सर्कलपर्यंत नेली. तेथून सर्व्हीस रोडवरुन तीन हात नाक्याकडे आणून पुन्हा नाशिकच्या दिशेकडे पिटाळली. मोटारीला लटकलेल्या अवस्थेतील पोलीस हवालदार फरफटत जात असल्याचे पाहून काही नागरिकांनी ही गाडी कशीबशी थांबविली. गाडीच्या काचा फोडून चालकाला बाहेर काढण्यात आले. नौपाडा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने अखेर चालक नवीनला अटक केली. या गोंधळात त्याच्या शेजारी बसलेली महिला पसार झाली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.