मोफत शिक्षण हा संवैधानिक हक्क, जेएनयू विद्यार्थ्यांना ठाण्यात समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 05:01 PM2019-11-25T17:01:58+5:302019-11-25T17:02:46+5:30
मोफत केजी ते पीजी शिक्षण, हा संवैधानिक हक्क मिळायलाच हवा, अशी जोरदार मागणी
ठाणे : जेएनयुमधील अन्यायग्रस्त फी-वाढीविरोधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दडपण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांच्या नेतुत्वाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतिक साबळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. रुपेश हुंबरे व इंजि. हर्षाली गवई, ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील गवई, बदलापूर अध्यक्ष डॉ.समृध्दी बावीस्कर, उल्हासनगर अध्यक्ष इंजि. प्रणाली गवई, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष किरण पगारे, कल्याण डोंबिवली शहर संघटक रोहित डोळस तसेच वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ठाकरे व ठाणे शहर अध्यक्ष संजय मिरगुडे व लोकराज संघटन व अन्य संघटनांचे कार्यकर्ते व नागरिकांनी या निदर्शनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.
जेएनयु विद्यार्थ्यांच्या वसतिगृह शुल्क वाढीच्या आंदोलनाला पाठिंबा देत या विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीमार दिल्ली पोलिसांनी केला आहे, त्याचा जाहीर निषेध करण्यात आला. सरकारने यापुढे पोलीस बलाचा वापर शांततामय आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर करू नये, याबाबत कायदा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॅग च्या अहवालानुसार २.१८ लाख कोटी रुपयांचा फंड शिक्षण व स्वच्छतेसाठी जम केला आहे, त्याचा वापर न करता हा फंड असाच पडून आहे. हा फंड विद्यापीठात शिकणाऱ्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप, वसतिगृह विकास, पुनर्बांधणी, सफाई व खान कामगारांची मुले, त्यांच्या शिक्षणासाठी वापरावा अशीही मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, उच्च शिक्षण आयोग कायदा/विधेयकाच्या मदतीने सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संस्था व दर्जा अतिशय खालावत चालला आहे, याचा निषेध करून KG टू PG शिक्षण मोफत करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.