मतदारांच्या नशिबी मनस्ताप, ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारयाद्यांमध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:52 AM2019-04-30T00:52:57+5:302019-04-30T00:53:37+5:30

मीरा-भाईंदरमध्ये सकाळपासून मतदान करण्यासाठी उत्साहाने बाहेर पडलेल्या मतदारांना ईव्हीएम यंत्राच्या घोळासह मतदानासाठी होणारा विलंब, मतदारयाद्यातील गोंधळ, मतदानकेंद्रात असलेली गैरसोय आदींचा मनस्ताप सहन करावा लागला

Constraints of voters, failure in EVMs, ruckus among voters | मतदारांच्या नशिबी मनस्ताप, ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारयाद्यांमध्ये घोळ

मतदारांच्या नशिबी मनस्ताप, ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारयाद्यांमध्ये घोळ

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये सकाळपासून मतदान करण्यासाठी उत्साहाने बाहेर पडलेल्या मतदारांना ईव्हीएम यंत्राच्या घोळासह मतदानासाठी होणारा विलंब, मतदारयाद्यातील गोंधळ, मतदानकेंद्रात असलेली गैरसोय आदींचा मनस्ताप सहन करावा लागला. बहुतांश ठिकाणी सकाळी ७ ची वेळ असूनही मतदान अर्धा ते एक तास उशिराने सुरू झाले. अनेक ठिकाणी मतदानयंत्रे बंद पडल्याने मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागले. मतदानासाठी वेळ लागत असल्याने रांगेतील मतदारांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले.
मीरा-भाईंदरमध्ये सकाळपासून मतदारांनी मतदानकेंद्रांकडे मतदानासाठी पाय वळवले. परंतु ७ वाजले तरी मतदान सुरूच झाले नव्हते. मतदानयंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, तपासणी तसेच ते सुरू असल्याबाबतची खात्री करण्यातच अर्धा ते एक तास बहुतांश मतदानकेंद्रांमध्ये गेला. महापालिका मुख्यालयातील मतदानसुद्धा अर्धा तास उशिरा सुरू झाले. भाईंदर सेकंडरी, उत्तन, काशिमीरा आदी अनेक भागांत तसाच अनुभव आला. भाईंदर पूर्वेच्या अभिनव शाळेतदेखील मतदानयंत्रातील गोंधळामुळे अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले.

सकाळी उशिराने मतदान सुरू झाले असताना ठिकठिकाणी मतदानयंत्रातील बिघाड व बंद पडल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. राई गावातील केंद्र क्रमांक ७३ मधील मतदानयंत्र दुपारी १२ च्या सुमारास बंद पडले. तब्बल ४० मिनिटे यंत्र बंद होते. शंकर नारायण महाविद्यालयातील एक यंत्र दुपारी साडेबाराच्या सुमारास बंद पडले. सुमारे दोन-अडीच तासांनी दुसरे यंत्र सुरू करण्यात आले. नवघर पालिका शाळेतील मतदानयंत्र सायंकाळी ४.२० च्या सुमारास बंद पडले. तिकडेसुद्धा जवळपास ४० मिनिटे मतदान करणे बंद ठेवले होते.

मीरारोडच्या नयानगरमधील अंजुमन यतम्मा शाळेतील मतदानयंत्र दुपारी दीडच्या सुमारास बंद पडले. पाऊण तासांनी मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. शिवार उद्यानाजवळील सरदार पटेल शाळेतसुद्धा जवळपास अर्धातास यंत्र बंद पडल्याने मतदान थांबले होते. काशीगाव शाळेतील केंद्र क्रमांक १७१ मधील मतदानयंत्र दीड तास बंद पडले. शिवाय, याच शाळेतील केंद्र क्र. १६८, १७० मधील मतदानयंत्रांचाही घोळ झाला. मतदानयंत्र बिघडल्याने ठिकठिकाणी मतदान थांबवण्यात आले होते. त्यामुळे मतदारांनी कंटाळून मतदान न करताच घरचा रस्ता पकडला. शंकर नारायण येथे मतदानासाठी सपत्नीक आलेले कृष्णा तळेकर यांनी यंत्र बंद पडल्याने संताप व्यक्त केला. बराच वेळ थांबून शेवटी मतदान न करताच परत जात असल्याचे ते म्हणाले.

मतदानास सकाळी उशिरा झालेली सुरुवात, मतदानयंत्रातील बिघाड आदींमुळे मतदार त्रासलेले असतानाच मतदानप्रक्रियेसाठी अनेक ठिकाणी विलंब लागत होता. अनेकांचे मतदारयादीतून नाव गायब झाले होते. राहत्या घराऐवजी लांबचे मतदान केंद्र आल्याचे प्रकारसुद्धा घडले. गोडदेवमधील एका मतदाराचे उत्तन येथे नाव आले होते. मतदानास लहान बाळासह येणाऱ्या महिलांकरिता पाळणाघर ठेवणे आवश्यक असले, तरी अनेक ठिकाणी केवळ पाळणाघराचे फलकच होते. पालिका मुख्यालयाबाहेर तयार केलेल्या पाळणाघरात तर एकही कर्मचारी वा कुठलीच सुविधा नव्हती. असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

अपंगांसाठी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या असल्या, तरी मीरा रोडच्या सेंट होम शाळेत ती व्यवस्था नसल्याने अपंग मतदारास उचलून न्यावे लागले. शांतीनगर सेक्टर ५ मध्ये व्हीलचेअर होती, पण त्याला सीटच नव्हते. उन्हाच्या झळा तीव्र असताना पुरेसे पंखे आदी सुविधा मतदानकेंद्रांत नव्हत्या. पालिका मुख्यालयातील मतदानकेंद्रातसुद्धा पंखे नव्हते. वर्गखोल्यांच्या बाहेरील पॅसेजमद्धेसुद्धा पंखे नसल्याने मतदार गरमीने त्रस्त झाले होते.

पोलीस बंदोबस्त सर्वत्र कडेकोट होता. राजकीय पक्षांना मतदानकेंद्रांच्या परिसरात मंडप आदी टाकण्यासही पोलिसांनी नकार दिला. काही भागातील लावलेले मंडप काढून टाकण्यात आले. मतदानकेंद्रांमध्ये काही नगरसेवक सर्रास वावरताना दिसत होते. त्यांना कोणी विचारत नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मतदानकेंद्रात नगरसेवक, आमदार खुलेआम सतत फिरत असल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाईची मागणी करणार असल्याचे शॉन कोलासो यांनी सांगितले.

भाईंदर पोलिसांनी लेखी पत्र देऊनदेखील मोदी, पटेल नाक्यावरील अवर लेडी ऑफ वेलंकनी या अतिशय गचाळ अशा शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आल्याने मतदारांसह सर्वांनीच संताप व्यक्त केला. अरुंद जिने असल्याने काही ज्येष्ठ नागरिक मतदान न करताच गेले. अपंग व ज्येष्ठांना व्हीलचेअरमधून नेण्याची सोयच नव्हती. शाळेत अत्यंत अरुंद जागा असल्याने लोकांची घुसमट होत होती. भाईंदरच्या बालाजीनगरमधील पद्मावती टॉवरमध्ये राहणाºया पूजा जितेंद्र जैन या मतदानासाठी गेल्या असता, त्यांना मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. पूजा यांना धक्काच बसला. बोगस मतदानाचा संशय होता. त्यामुळे पूजा यांचे टेंडर मागे घेतले. पण नंतर कळले की, दीडशे फुटी मार्गावरील पद्मावतीनगरमध्ये राहणारी त्याच नावाची तरुणी मतदान करून गेली आहे. पण नाव सारखे असले तरी मतदानकेंद्रातील अधिकाऱ्यांनी चेहरादेखील पडताळला नसल्याचे समोर आले.

Web Title: Constraints of voters, failure in EVMs, ruckus among voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.