कोसबाड-वरठा नाल्यावर नवीन पूल बांधा; विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:38 AM2023-07-08T07:38:37+5:302023-07-08T07:38:44+5:30
वरठापाड्याच्या नाल्यावर पूल नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात नाला ओलांडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
- आरिफ पटेल
मनोर : पालघर तालुक्यातील पूर्वेकडील दुर्गम भागातील कोसबाड-वरठा पाड्यातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढावा लागतो, या संदर्भात मंगळवारी (४ जून) ‘जीव मुठीत घेऊन आदिवासींचा नाल्यातील धोकादायक प्रवास’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना तसेच पालघर जिल्हाधिकारी यांना त्या नाल्यावर नवीन पूल बांधण्याचे पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
डॉ. गोऱ्हे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे, ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अतिदुर्गम, आदिवासी परिसरातील मौजे कोसबाड येथील वरठापाड्याच्या नाल्यावर पूल नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात नाला ओलांडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पूल मंजूर असूनही २० वर्षांपासून तो लालफितीत अडकला असल्याने प्रसिद्ध झाले आहे. तेथील आदिवासी शाळकरी विद्यार्थी, गर्भवती माता व ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी पालघर तालुक्यातील कोसबाड-वरठापाडा येथील नाल्यावर नवीन पूल बांधण्याबाबत जिल्हा नियोजन समिती वा इतर निधींच्या माध्यमातून पुलाच्या बांधकामास मंजुरी देऊन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.