भिवंडी तालुक्यात १७ नव्या महसुली गावांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:40+5:302021-07-10T04:27:40+5:30
नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी तालुक्याचा महसुली विस्तार मोठा असून, या भागात फोफावलेल्या गोदाम व्यवसायामुळे येथील ...
नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्याचा महसुली विस्तार मोठा असून, या भागात फोफावलेल्या गोदाम व्यवसायामुळे येथील जमिनीचे महत्त्व वाढले आहे. १९७८पासून ठप्प असलेल्या नव्या महसुली गाव निर्मितीस तहसीलदार अधिक पाटील यांनी चालना देत १७ नव्या महसुली गावांची निर्मिती केली आहे. या गावांचे जमीन अभिलेख स्वतंत्र करून ते संगणकीय प्रणालीत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सहा गावांचे काम पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी गुरुवारी दिली आहे.
जुन्या महसुली गावांची विभागणी करून राजनगर, साईगाव, ठाकूरगाव, शिवनगर, कैलासनगर, ब्राह्मणगाव, खार्डी, मालोडी, शिवाजीनगर, चिराडपाडा, आतकोली, सोनटक्का, मोहिली बु, हिवाळी, रवदी, पायगाव, घोलगाव या नव्या महसुली गावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर तालुक्यात कार्यरत सहा मंडल अधिकारी व ३८ तलाठी सजा कार्यालयांतही वाढ केली आहे. शेलार व अंबाडी या दोन नव्या मंडल कार्यालयांची निर्मिती करून एकूण आठ मंडल कार्यालयांतर्गत १० नव्या तलाठी सजा कार्यालयांची भर पडल्याने एकूण ४८ तलाठी सजा निर्माण करण्यात आले आहेत.
-------
स्थानिक जमीनधारकांना तत्काळ जमीन अभिलेख उपलब्ध व्हावा व गतिमान प्रशासन राबविता यावे, यासाठी १९७८नंतर भिवंडी तालुक्यात महसूल विभागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले आहेत.
- अधिक पाटील, तहसीलदार, भिवंडी
-------------