उंभार्ली टेकडीवर श्रमदानातून साकारले तलाव, कुंड, चर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:56+5:302021-05-21T04:42:56+5:30

डोंबिवली : उंभार्ली येथील पक्षी अभयारण्यामध्ये जूनपासून सुरू होणारा पावसाळा लक्षात घेता मार्चपासूनच श्रमदानाला सुरुवात झाली होती. मे महिना ...

Construction of lakes, ponds and ditches on Umbharli hill | उंभार्ली टेकडीवर श्रमदानातून साकारले तलाव, कुंड, चर बांधकाम

उंभार्ली टेकडीवर श्रमदानातून साकारले तलाव, कुंड, चर बांधकाम

Next

डोंबिवली : उंभार्ली येथील पक्षी अभयारण्यामध्ये जूनपासून सुरू होणारा पावसाळा लक्षात घेता मार्चपासूनच श्रमदानाला सुरुवात झाली होती. मे महिना डोळ्यांसमोर ठेवून कामाचे नियोजन करण्यात आले. कुठे तळे, ओढे, चर करायचे हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ठरविण्यात आले. महाराष्ट्र दिवस, अक्षय्य तृतीया, रमझान ईद या सुट्यांचा वापर करून सलग ७ दिवस, २५ तास ३० स्वयंसेवकांनी श्रमदान केले.

उंभार्ली, सोनारपाडा, दावडी, भाल, धामटन, खोनी आणि निळजे या डोंबिवली पक्षी अभयारण्यालगतच्या गावांतील ग्रामस्थ आणि डोंबिवली शहरातून अनेक स्वयंसेवक या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती आयोजक, पर्यावरणप्रेमी मंगेश कोयंडे यांनी दिली.

सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात दोन ठिकाणी हे काम करण्यात आले. टेकडीच्या खालच्या बाजूला असलेल्या मातीच्या रस्त्यालगत असलेल्या डोंगरउतारावर तलाव, चर, बांध खोदण्यात आले आणि नवीन झाडेही लावण्यात आली. त्याचप्रमाणे उंबराचे पाणी पाणवठ्यावर मोठे तलाव, चर, बांध, दगडी बंधारा बांधण्यात आला. नैसर्गिक दगडी कुंडामध्ये साचलेला गाळ काढण्यात आला आणि नवीन झाडे लावण्यात आली.

खालच्या बाजूच्या जंगलात मातीच्या रस्त्यालगत मोठा तलाव साधारण १ फूट खोल, छोटा तलाव साधारण २ फूट खोल, ३ मोठे चर, ३ छोटे चर, १ बांध आणि १५ झाडांची लागवड करण्यात आली. उंबराचे पाणी पाणवठ्यावर मोठा तलाव साधारण ४ फूट खोल, छोटा तलाव साधारण २ फूट खोल, ५ मोठे चर, ४ छोटे चर, २ बांध, १ दगडी बंधारा, १ दगडी कुंड आदी काम करून सुमारे १५ झाडे लावण्यात आली.

या उपक्रमामध्ये भूजलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले, स्ट्रक्चरल इंजिनीअर हेमंत वढाळकर, सिव्हिल इंजिनीअर कीर्ती वढाळकर, सुनील सहस्रबुद्धे, गिर्यारोहक अतुल खरे, वेस्ट मॅनेजमेंट तज्ज्ञ महेश खरे, हायड्रो मार्किंगतज्ज्ञ त्रिलोचन परब आदींसह तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळाल्याचे कोयंडे यांनी सांगितले.

------------

Web Title: Construction of lakes, ponds and ditches on Umbharli hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.