चिखलोली स्थानकाच्या उभारणीला मिळाला मुहूर्त

By पंकज पाटील | Published: October 12, 2023 02:45 PM2023-10-12T14:45:59+5:302023-10-12T14:46:15+5:30

या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Construction of Chikhloli station got the time | चिखलोली स्थानकाच्या उभारणीला मिळाला मुहूर्त

चिखलोली स्थानकाच्या उभारणीला मिळाला मुहूर्त

अंबरनाथ : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली चिखलोली रेल्वेस्थानकाची अंबरनाथ आणि बदलापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. रेल्वे प्रशासनाने चिखलोली स्थानक उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून, तब्बल ८२ कोटी रुपये खर्च करून चिखलोली स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प अर्थात एमयूटीपी ३ अंतर्गत कल्याण ते बदलापूर रेल्वेस्थानकादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे ट्रॅकचे काम केले जाणार आहे. याच प्रकल्पांतर्गत अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकादरम्यान चिखलोली स्थानक उभारले जाणार आहे. 

गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून चिखलोली रेल्वेस्थानक लवकरच उभारले जाईल, अशी बतावणी करून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या गृहप्रकल्पातील घरे विकली होती.  मात्र प्रत्यक्षात चिखलोली स्थानक उभे न राहिल्यामुळे घर घेतलेल्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चिखलोली रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्यानंतर या रेल्वेस्थानकाच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. 

तसेच हे स्थानक उभारण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य शासन यांनी आर्थिक हातभार लावण्यास मंजुरी दिली होती. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली आहे.

- चिखलोली रेल्वेस्थानक उभारण्यासाठी जी निविदा काढण्यात आली आहे, त्या निविदेची मुदत २३ नोव्हेंबरपर्यंत आहे. ही निविदा उघडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.''

- एकीकडे निविदा काढलेली असताना दुसरीकडे रेल्वेस्थानकाची जागा ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्यात आली आहे.

- चिखलोली रेल्वेस्थानकांसोबतच कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका टाकण्यासाठी जी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती ती पूर्णत्वास नेणार आहेत. या प्रकल्पासाठी २०८ कोटींचा प्रस्ताव असून, त्यातील १०४ कोटी रुपये राज्य शासन रेल्वे प्रशासनाला हा प्रकल्प उभारण्यासाठी देणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

- चिखलोली रेल्वेस्थानक आणि तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचे काम करण्यासाठी निधी अपुरा पडल्याने त्याला काहीसा उशीर झाला होता. त्यात कोरोना काळामुळेदेखील ही प्रक्रिया लांबली होती. आता निविदा प्रक्रिया झाल्याने चिखलोली स्थानकाला मुर्त स्वरूप येणार आहे.

Web Title: Construction of Chikhloli station got the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.