बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून हडपलेल्या जमिनीवर गोदामाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 09:15 PM2020-02-09T21:15:51+5:302020-02-09T21:19:33+5:30
मृत पावलेल्या आणि अशिक्षित असलेल्या व्यक्तींच्या कुलमुखत्यारत्रापत्रावर स्वाक्षऱ्या करुन बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे हाडपलेल्या जमिनीवर गोदामाचे बांधकाम करणाºया प्रकाश नानजी पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १५६ (३) प्रमाणे ठाणे न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश वर्तकनगर पोलिसांना शनिवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून त्याआधारे जमीन हडप करून गोदामाचे बांधकाम केल्याप्रकरणी प्रकाश नानजी पटेल (३५, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याच्याविरुद्ध बबन कान्हा पाटील यांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १५६ (३) प्रमाणे ठाणे न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश वर्तकनगर पोलिसांना शनिवारी दिले.
बबन पाटील यांची भिवंडीतील पिंपळास येथे ११ गुंठे शेतजमीन आहे. २०१५ मध्ये प्रकाश पटेल यांनी त्यांना काहीही न सांगता त्यांच्या जमिनीवर भराव टाकून त्यावर भूमी वर्ल्ड नावाने गोदाम पार्कची उभारणी केली. बबन पाटील यांनी अटकाव करूनही ती जागा आपली असल्याचा दावा करीत त्यांना धमकी दिली. अखेर, त्यांनी याप्रकरणी पिंपळास ग्रामपंचायत, भिवंडी तहसीलदार कार्यालय आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रकाश पटेल यांच्याविरुद्ध तक्रार केली. कालांतराने १५ आॅक्टोबर २०१९ रोजी बबन यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळाली की, प्रकाश पटेल यांनी बबन पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे २७ मे २००८ रोजी कुलमुखत्यारपत्र तयार केले आहे. त्यात त्यांचा मोठा चुलता सीताराम पाटील, वडील कान्हा पाटील तसेच लहान चुलते चिंतामण पाटील यांच्या अनुक्रमे स्वाक्ष-या आणि ठसेही या कुलमुखत्यारपत्रामध्ये होते. विशेष म्हणजे त्यांचे चुलते सीताराम पाटील यांचा १८ डिसेंबर १९८९ रोजी मृत्यू झाला असूनही २००८ मध्ये तयार करण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्रामध्ये त्यांची स्वाक्षरी दिसून आली. त्यांचे वडील कान्हा पाटील हे अशिक्षित असूनही त्यांची स्वाक्षरीही त्या कागदपत्रांवर होती. चिंतामण पाटील यांचा बनावट अंगठा त्यावर होता. अशा प्रकारे प्रकाश पटेल यांनी बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून ते एमएमआरडीएच्या ठाणे कार्यालयामध्ये सादर केले. त्या जागेवर बांधकामाची परवानगी घेऊन गोदामाचे बांधकाम पटेल याने केले. हे लक्षात आल्यानंतर पटेल यांच्याविरुद्ध त्यांनी न्यायालयामार्फत वर्तकनगर पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल केला आहे.