अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:37 AM2020-02-19T01:37:20+5:302020-02-19T01:37:31+5:30

वाकण-पाली मार्गावरील पूल : भार पेलण्याची क्षमता ७५ टन; उंची, रुंदी वाढवली

Construction work on a new bridge over the river Amba | अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू

अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू

Next

विनोद भोईर

पाली : वाकण-पाली मार्गावरील अंबा नदीवर नवीन पुलाच्या निर्माणाचे काम सुरू झाले आहे. या नवीन पुलाची रुंदी १६ मीटर असून उंची जुन्या पुलापेक्षा पाच ते सहा फूट अधिक होणार आहे आणि भार पेलण्याची क्षमता तब्बल ७५ टन म्हणजे जुन्या पुलापेक्षा साडेतीनपट अधिक असणार आहे. पुलाचे निर्माण काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरून वाहते. या दिवसांत अंबा नदी पुलावरून नेहमी पाणी जाते. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबते. तसेच पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून जातात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने जाणे, पुलावरील खड्डे यामुळे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. परिणामी पुलावरून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे. नवीन पुलामुळे आता येथून प्रवास करणे सुरक्षित व सुलभ होणार आहे.

पाली-खोपोली मार्गावरील जांभूळपाडा व भालगुल येथील पुलांची दुरवस्था झाली असून ते पूलदेखील धोकादायक झाले आहेत. मात्र या दोन्ही पुलांच्या जागी आता नवीन व अंबा नदी पुलाप्रमाणेच पूल बांधले जाणार आहेत. त्यांचेही काम या आठवडाभरात सुरू होणार असल्याचे एमएसआरडीसी चे उपअभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले. यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरून प्रवास करणे सुखकर होणार आहे. वाकण-पाली खोपोली मार्गावरील हे तिन्ही पूल मुंबई- गोवा महामार्ग व मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाला जोडतात. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. केवळ १९ टन वजन भार पेलण्याची क्षमता असलेल्या या पुलांवरून ६० टनाची वाहतूक होत आहे. त्यामुळे हे पूल दिवसेंदिवस कमकुवत व धोकादायक होत आहेत. मात्र, आता पाली, जांभूळपाडा व भालगुल येथे नव्याने होणारे पूल हे आधीच्या पुलांपेक्षा पाच ते सहा फूट उंच होणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार नाही. या पुलांची क्षमता ७५ टन वजन सहन करण्याची असल्याने बळकटी मिळणार आहे. रुंदीही जास्त असणार आहे. एकाच वेळी वाहने जाऊ शकणार आहेत.

तीनही पुलांचे काम नऊ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. सुरुवातीस आठ मीटर रुंदीचे पूल एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर जुने पूल तोडून त्या जागी दुसरे आठ मीटरचे पूल बांधण्यात येतील. दर्जेदार व योग्य वेळेत काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
- सचिन निफाडे,
उपअभियंता,
एमएसआरडीसी

पाली-वाकण मार्गावर अंबा नदीवरील पूल तसेच पाली-खोपोली मार्गावर जांभूळपाडा आणि भालगुल हे तीनही पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत. पावसाळ्यात तर पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत असते. त्यामुळे वेळीच नवीन पुलांची निर्मिती होणे गरजेचे होते. सद्य:स्थिती पाली-वाकण मार्गावर अंबा नदी पुलाचे काम सुरू आहे. काही दिवसांनी जांभूळपाडा व भालगुल येथील नवीन पुलांची कामे सुरू होतील, मात्र हे नवीन होणारे पूल दर्जेदार होणे आवश्यक आहे.
- सुशील शिंदे,
सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस,
पाली शहर

Web Title: Construction work on a new bridge over the river Amba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे