गुगलवर विविध कंपन्यांच्या नावाने कर्ज देण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: December 23, 2019 10:03 PM2019-12-23T22:03:26+5:302019-12-23T22:07:53+5:30
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका ७० वर्षीय महिलेला एका भामट्याने मोबाइलवर एक लिंक पाठविली होती. ती पाहिल्यानंतर तिच्या बँक खात्यातून ६१ हजारांची रोकड गायब झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे कोणी कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली तर सावधानता बाळगा, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोणी कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली तर सावधानता बाळगा, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे. कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका ७० वर्षीय महिलेला एका भामट्याने मोबाइलवर एक लिंक पाठविली होती. ती पाहिल्यानंतर तिच्या बँक खात्यातून ६१ हजारांची रोकड गायब झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे.
ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत राहणाऱ्या अनिता पाठारे (नावात बदल) या शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या महिलेला कौटुंबिक कामासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी तिने आणि तिच्या पतीने इंटरनेटच्या माध्यमातून कर्ज देणाºया कंपनीचा क्रमांक शोधला. तेव्हा गुगलद्वारे त्यांना राहुल शर्मा याचा मोबाइल क्रमांक मिळाला. या क्रमांकावर पाठारे यांनी फोन केला. तेव्हा आपण बजाज कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, अशी त्याने बतावणी केली. त्यानंतर, त्याने पाठारे यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली. ती शर्मा यांनी उघडून पाहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून यूपीआय आणि पेटीएमद्वारे ६१ हजार ५६० रुपयांची रोकड त्याने लंपास केली. या प्रकारानंतर पाठारे यांनी शर्माला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळले. ज्या बँकेतून त्यांचे पैसे काढण्यात आले, ती बँक ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे. त्यामुळे याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच तक्रारीचा तपास २३ डिसेंबरपासून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेल विभागामार्फत करण्यात येत आहे.
-------
गुगलवरील कोणत्याही क्रमांकापासून सावधान
सध्या गुगलवर बनावट कस्टमर केअर क्रमांकांचा सुळसुळाट झाला आहे. आॅनलाइन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणारे भामटे हे आपल्या जाळ्यात सावज ओढण्यासाठी असे बनावट कस्टमर केअर क्रमांक गुगलवर अपलोड करतात. त्यांनी अपलोड केलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर फोन करणाºया व्यक्तीच्या मोबाइलवर हे भामटे अशीच एखादी लिंक पाठवितात. ती पाहणाºयाच्या बँक खात्यातून हे भामटे आॅनलाइनद्वारे सफाईदारपणे पैसे लंपास करतात. अशा भामट्यांनी कर्ज देणाºया वित्तीय संस्थांपासून ते गृहोपयोगी वस्तू घरपोच देणाºया आॅनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या नावाने बोगस कस्टमर केअर क्रमांक गुगलवर अपलोड केले आहेत. त्यामुळे गुगलवरून सर्च केलेल्या कस्टमर क्र मांकावर फोन करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने केले आहे.