मुहूर्तावर सुवर्ण खरेदी झाली... पण ती लगीन सराईची; वाळे अन् नाणे खरेदीकडे ग्राहकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:05 PM2022-04-04T12:05:40+5:302022-04-04T13:27:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा विशेष कल ...

Consumers have a special tendency to buy gold on the occasion of Gudhipadva. | मुहूर्तावर सुवर्ण खरेदी झाली... पण ती लगीन सराईची; वाळे अन् नाणे खरेदीकडे ग्राहकांची पाठ

मुहूर्तावर सुवर्ण खरेदी झाली... पण ती लगीन सराईची; वाळे अन् नाणे खरेदीकडे ग्राहकांची पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा विशेष कल असतो. त्यामुळे सुवर्णकारांच्या व्यवहारात यादिवशी मोठी उलाढाल होत असते. दोन वर्षांनी कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर ग्राहकांनी पाडव्याची खरेदी केली; परंतु ती केवळ लग्नानिमित्त वधू- वरांसाठी लागणाऱ्या सुवर्णालंकारांची होती. त्यामुळे यंदाचा पाडवा सराफांना कहीं खुशी कहीं गम असाच होता, अशी माहिती ज्वेलर्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

तब्बल दोन वर्षांनी कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी गुढीपाडव्याला ग्राहकांची मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा सराफा बाजारातील व्यापाऱ्यांना होती. प्रत्यक्षात शनिवारी दुपारपर्यंतदेखील शहरातील सराफा बाजारात फारशी रेलचेल नव्हती. सायंकाळनंतर शहरातील नामांकित दुकानांसह जांभळीनाका, कळवा, नौपाडा, लोकमान्यनगर, मानपाडा आणि घोडबंदर रोड आदी भागांतील दुकानांमध्ये ग्राहकांनी मुहूर्तावर सोनेखरेदी केल्याचे व्यापारी सांगतात. आपला अनुभव सांगताना ठाणे शहर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश श्रीश्रीमाल म्हणाले, ‘एरव्ही, मुहूर्ताच्या सोने खरेदीसाठी ग्राहकांचा जो प्रतिसाद असतो, तसा प्रतिसाद यंदा नव्हता. कोरोनापूर्वी दोन वर्षांपूर्वी खास मुहूर्तानिमित्त उत्स्फूर्तपणो सोन्याचे दागिने, नाणे आणि वाळे खरेदीसाठी ग्राहक यायचे. यंदा अगदी पाच किंवा एक ग्रॅम खरेदीलाही प्रतिसाद नव्हता.

अगदी तुरळक ग्राहकांनीच नाणी किंवा शुद्ध सोने असलेल्या २४ कॅरेटच्या वाळ्यांची खरेदी केली. लग्नानिमित्त ज्यांना वधू- वरांसाठी दागिने खरेदी करायचे होते. त्यांनीच पाडव्याच्या या खरेदीचा मुहूर्त साधल्याचेही अन्य एका सराफाने सांगितले. ठाण्यातील अन्य एका नामांकित सराफाच्या दुकानात मात्र ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ही उलाढाल किती लाखांपर्यंत होती, ती मात्र सांगण्यास या सराफ्याने नकार दिला; परंतु खास पाडव्यानिमित्त सोन्याची नाणी किंवा वाळे खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अभय वाघाडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

निर्बंध नसल्यामुळे यंदा गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदी विक्रीला मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदा केवळ मुंज आणि लग्नाची खरेदी ग्राहकांनी केली.

-अभय वाघाडकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार महामंडळ तथा सोने चांदीच्या दागिन्यांचे विक्रेते, ठाणे आणि डोंबिवली

Web Title: Consumers have a special tendency to buy gold on the occasion of Gudhipadva.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.