प्रतिबंधित क्षेत्रातील ग्राहकांनी वीज मीटरचे फोटो सबमिट करावेत, महावितरणचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 05:20 PM2020-07-17T17:20:16+5:302020-07-17T17:24:09+5:30
कल्याण परिमंडळात सुमारे अडीच लाख ग्राहक प्रतिबंधित क्षेत्रात
डोंबिवली - महावितरणच्या कल्याण परिमंडलातील २५ लाख वीज ग्राहकांपैकी ९० टक्के ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित १० टक्के म्हणजे सुमारे अडीच लाख ग्राहक कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधित भागात असल्याने या ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेणे शक्य नाही. प्रत्यक्ष वीज वापरानुसार वीजबिल देणे शक्य व्हावे यासाठी या ग्राहकांनी त्यांच्या मीटर रीडिंगचे फोटो स्वतःहून सबमिट करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. संबंधित ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस पाठवून मीटर रिडींग सबमिट करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
कल्याण परिमंडलातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, वसई, वाडा, आचोळे, विरार, नालासोपारा, बोईसर, डहाणू, जव्हार, पालघर, मोखाडा, सफाळे, विक्रमगड, तलासरी आदी भागात एकुण २५ लाख वीजग्राहक आहेत. यातील १५ लाख वीज ग्राहकांची चालू महिन्याची वीजबिले १६ जुलैपर्यंत तयार झाली आहेत. तर यात जवळपास १३ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांची वीजबिले ही ग्राहकांचा वीज वापर व मीटर रीडिंगनुसार आहेत. मीटर रीडिंग होऊ न शकलेले ग्राहक प्रतिबंधित क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) आहेत. प्रतिबंधित क्षेत्राच्या मर्यादेमुळे जून महिन्यात कल्याण परिमंडलातील जवळपास ७० टक्के ग्राहकांना मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिले देण्यात आली होती. उर्वरित ग्राहकांना प्रचलित पद्धतीनुसार सरासरी बिल आकारणी करण्यात आली होती. तर जुलै महिन्यात ९० टक्के ग्राहकांना मीटर रीडिंगनुसार वीजबिले देण्याचे नियोजन आहे. परिमंडलातील सर्वच ४० उपविभागीय कार्यालयांकडून वेबिनार, ग्राहक मेळावे व खुले चर्चासत्र, नोंदणीकृत मोबाईल, 'एसएमएस', फेसबुक, व्हॉट्स अँप व प्रत्यक्ष संवादाद्वारे वीजबिलाच्या अचूकतेबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. वीजबिलात तुलनात्मक माहिती ग्राहकांना केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून आपले वीजबिल पडताळून पाहणे सोयीचे व्हावे यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावरील गाहकांसाठीच्या पोर्टलवर वीजबिल तपासता येईल. याशिवाय वीजबिलावर गतवर्षी व यावर्षीचा वीजवापर, दिलेले वीजबिल याची तुलनात्मक माहिती देण्यात आली आहे. यातून ग्राहकांना आपले वीजबिल समजून घेण्यात अधिक मदत होणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.