देशभरातील ९८ बुकी सोनूच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:39 AM2018-05-31T02:39:13+5:302018-05-31T02:39:13+5:30
आयपीएल तसेच क्रिकेटच्या इतर खेळांवर जगभरातून सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलाल
ठाणे : आयपीएल तसेच क्रिकेटच्या इतर खेळांवर जगभरातून सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याला आता २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. क्रिकेटवर सट्टा लावणारे देशभरातील ९८ बुकी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री बुकी सोनूला अटक केली. त्याच्यावर यापूर्वीही मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैदराबाद सुपरकिंग्ज असा सामना रंगला होता. याच शेवटच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्ली अशा मोठ्या शहरांमधील सुमारे ९८ बुकी हे जलालच्या संपर्कात होते. यात काही परदेशी बुकींचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे परदेशातील कोणकोण साथीदार आहेत? पैशांची देवाणघेवाण ते कशा प्रकारे करत होते? अशा अनेक बाबींचा उलगडा होणे बाकी असल्यामुळे ठाणे पोलिसांनी बुधवारी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.
डोंबिवलीतून पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने १६ मे २०१८ रोजी तिघांना अटक केली होती. त्यांच्याच माहितीच्या आधारे पुढे खुशाल भिया आणि बिट्टू व्रजेश जोशी या दोघांना मुंबईतून खंडणीविरोधी पथकाने अटक केली.