भीषण अपघात! कंटेनरला ट्रकने दिली धडक; ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश
By अजित मांडके | Published: August 20, 2022 08:06 AM2022-08-20T08:06:55+5:302022-08-20T08:09:41+5:30
Thane News : अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ठाणे - ठाण्याकडून भिवंडी, पडघा येथे जात असताना समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने जोरदार मागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळ घडली. या अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करून रस्ता मोकळा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले.
ट्रक चालक सोलकर हे ठाण्यातील वागळे इस्टेट, सीपी तलाव येथे राहणारे आहेत. ते आपला रिकामा ट्रक घेऊन तीन हात नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गे भिवंडी पडघा येथे जात होते. कॅडबरी जवळ आल्यावर त्यांनी आपल्या ट्रकने समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनर मागून जाऊन धडक दिली. तो कंटेनर वाशीहून भाईंदरला १५ टन बर्फाच्या लाद्या घेऊन जात होता. या अपघातात ट्रक चालक ट्रकमध्ये अकडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिस या विभागांनी धाव घेतली. तसेच अडकलेल्या सोलकर यांना आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तसेच नौपाडा पोलिसांनी ट्रक क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला केला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.