भार्इंदरमध्येही घराघरात दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Published: July 6, 2017 06:04 AM2017-07-06T06:04:39+5:302017-07-06T06:04:39+5:30

नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये

Contaminated water supply to households in Bhinder also | भार्इंदरमध्येही घराघरात दूषित पाण्याचा पुरवठा

भार्इंदरमध्येही घराघरात दूषित पाण्याचा पुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी भार्इंदर पश्चिम भागातही गढूळ पाणी आले. शहरभर दूषित पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मीरा रोडच्या शीतलनगर, शांतीपार्क भागात सोमवारपासून दूूषित पाणी पालिकेच्या जलवाहिन्यांमधून येऊ लागले. रहिवाशांनी तक्रारी करूनही पालिकेकडून समाधानकारक उत्तर वा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परंतु दूषित पाणीपुरवठा केवळ शीतलनगर वा शांतीपार्क पुरताच न होता भार्इंदर पूर्व, मीरा रोडमध्येही दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने होत आहे. बुुधवारी भार्इंदर पश्चिम, मुर्धा परिसरात दुर्गंधी पाणी आले.
संपूर्ण शहरात दूषित पाणीपुपरवठा होत असताना महापालिकेने मात्र सोयीस्कर डोळेझाकच चालवली. पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने सत्यस्थिती जाहीर केलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळासह संतापाची लाट उसळली आहे. वास्तविक ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तर शहरातही अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. लहान असो वा मोठी जलवाहिनी टाकल्यानंतर त्याची काटेकोर स्वच्छता करणे अत्यावश्यक असते. परंतु महापालिकेने जलवाहिन्यांच्या स्वच्छतेबद्दल सोयीस्कर दुर्लक्षच केले. पूर्णपणे जलवाहिन्या साफ झालेल्या नसतानाही त्यातून नागरिकांना पाणी सोडण्यात आले. दूषित पाणी हे उकळून पिण्यायोग्य तर सोडाच आंघोळ व कपडे धुण्यासाठीही नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. बाटलीबंद पाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. गढूळ पाणी इमारतींच्या तळ तसेच गच्चीवरील टाकीत तर गेलेच पण रहिवाशांच्या घरातील टाक्यां मध्ये देखील गेले. त्यामुळे टाक्या साफ करण्याचा नाहक भूर्दंड बसणार आहे.
मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेतली. या वेळी शहरातील दूषित पाणी पुरवठ्याबद्दल आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असताना त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सत्तधारी व प्रशासन या पैकी कुणीच नव्हते. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून टाक्यांची सफाई करण्यासाठी पडणारा भूर्दंड पालिका देणार का ? असा सवाल सुर्वे यांनी केला आहे.

पावसाची सुरूवात व साकेत- ओवळा दरम्यान ७५ दशलक्ष लिटर पाणी योजनेतील नवीन जलवाहिनी सुरू केल्याने एक ते दोन दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. क्लोरीन टाकले असले तरी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे.
- सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता.

महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा कळस असून दूषित पाण्याने संपूर्ण शहराला वेठीस धरले आहे. नव्या जलवाहिन्या पूर्णपणे स्वच्छ केल्याशिवाय त्यांचा वापर करायला नको होता. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
- रोहिदास पाटील, नगरसेवक.

पिण्यासाठी वा जेवणासाठी तर सोडाच पण भांडी, कपडे, आंघोळ आदी कामांसाठी देखील वापरू शकत नाही इतके घाणेरडे पाणी येत आहे. स्वच्छ पाणी आणायचे तरी कुठून ? पालिकेने टँकरने पाणी द्यावे.
- रंजना पाटील, गृहिणी.

Web Title: Contaminated water supply to households in Bhinder also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.