सफाई कामगारांच्या वस्तीला दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:39+5:302021-06-22T04:26:39+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा मुख्यालयामागील आंबेडकर रोडवर असलेल्या अंबे निवास या मनपाच्या सफाई कामगारांच्या वस्तीला दूषित पाणीपुरवठा होत ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा मुख्यालयामागील आंबेडकर रोडवर असलेल्या अंबे निवास या मनपाच्या सफाई कामगारांच्या वस्तीला दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी सोमवारी सफाई महिला कर्मचाऱ्यांनी मनपा मुख्यालयात धाव घेऊन दूषित पाणीपुरवठ्याविरोधात आवाज उठविला.
सविता सोलंकी आणि मंजिला परमार या सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अंबे निवास या वस्तीला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. मध्यरात्री १२ वाजता पाणी येते. अवघ्या अर्धा तासातच पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे आमच्या वस्तीतील महिलांना पाणीच मिळत नाही. अर्धा तास नळाला येणारे पाणीही पूर्णपणे दूषित आहे. या पाण्याला दुर्गंध येतो. त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. आम्हाला शुद्ध पाणी आणि नियमित पाणीपुरवठा करावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही सगळेच पहाटेच्या वेळी सफाईच्या कामाला घरातून बाहेर पडतो. त्यामुळे आमच्या घरी पहाटे ४ वाजता पाणी सोडल्यास अधिक चांगले होईल. मध्यरात्री १२ वाजता पाणी आले तर महिलांना रात्री जागून पुन्हा पहाटे उठून कामाला जावे लागते. आमची झोपमोड होते, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
----------------------