ब्रिटीशकालीन कळवा खाडीचे पुलाचे साहित्य जातेय चोरीला; पालिका करणार पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:54 PM2022-06-13T18:54:58+5:302022-06-13T18:56:24+5:30
कळवा आणि ठाण्याला जोडणारा ब्रिटीश कालीन खाडीपुल हा कमकुवत झाल्याने तो मागील कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा आणि ठाण्याला जोडणारा ब्रिटीश कालीन खाडीपुल हा कमकुवत झाल्याने तो मागील कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. मात्र आता पुलाचे साहित्य चोरीला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पुलाच्या अनेक ठिकाणी खोदलेले दिसत असून लोंखडी सळ्या व इतर साहित्य रोजच्या रोज गायब होत असल्याचे दिसत आहे. आधीच कमकुवत झालेल्या या पुलावरील साहित्य असेच गायब होत राहिले तर हा पुल काही दिवसातच इतिहास जमा होईल असे चित्र आहे.
ठाणे आणि कळव्याला जोडणारा कळवा खाडीवरील पहिला ब्रिटीशकालीन पुल हा खूप महत्वाचा मानला जात होता. सुमारे दिडशे वर्षापूर्वी ब्रिटीशांनी हा पुल उभारला होता. दगडी बुरजांचा वापर करुन हा पुल उभारण्यात आला होता. तसेच वरील बाजूस लोंखडी साहित्य आणि इतर साहित्याचा वापर हा पुल उभारण्यासाठी करण्यात आला होता. परंतु काही वर्षापूर्वी या पुलाच्या खालील बाजूस असलेले बुरुज पडू लागल्याने हा पुल सुरवातीला मोठय़ा वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर हा पुल छोटय़ा वाहनांसाठी देखील बंद करण्यात आला. त्यानुसार मागील आठ ते दहा वर्षापासून हा पुल वाहतुकीसाठी बंद असून येथून पादचारी जातांना दिसतात.
दरम्यान आता या पुलाच्या बाजूला पालिकेच्या माध्यमातून दुसरा पुल उभारण्यात आला असून तिसऱ्या पुलाचेही काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे ब्रिटीशकालीन पुल दुर्लक्षीत झाला आहे. मात्र आता पुलाकडे पाहिल्यावर धक्कादायक चित्र सध्या येथे दिसत आहे. वरील बाजूस अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे. तसेच बाजूचे संरक्षक कठडे फोडले गेल्याचे दिसून तेथील लोंखड काही ठिकाणी चोरीला गेल्याचेही दिसत आहे. खोदकाम करण्यात येत असल्याने हा पुल आणखी कमकवुत होऊ लागल्याचे चित्र आहे. मात्र हा पुल ब्रिटीश कालीन असल्याने या पुलाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र मागील काही दिवसापासून येथील लोंखड चोरीला जात असल्याने ते कोण चोरत आहे, याची माहिती पालिकेला नाही. तर रात्रीच्या सुमारास येथे गदेरुले येत असल्याने त्यांच्या माध्यमातून हे काम केले जात असल्याचेही येथील नागरीकांचे म्हणणे आहे.