पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
By admin | Published: October 16, 2015 02:56 AM2015-10-16T02:56:38+5:302015-10-16T02:56:38+5:30
परमार यांच्या आत्महत्येला आठ दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. अर्थात, त्यांच्या चिठ्ठीतील रोख नेमका कोणत्या अधिकारी किंवा राजकीय नेत्यांवर आहे
ठाणे : परमार यांच्या आत्महत्येला आठ दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. अर्थात, त्यांच्या चिठ्ठीतील रोख नेमका कोणत्या अधिकारी किंवा राजकीय नेत्यांवर आहे, त्यादृष्टीने तपास सुरू असून पुरावेही गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. यानुसार, त्यांच्या मोबाइल डाटाच्या आधारे त्यांनी ‘गोल्डन गँग’सह कोणाकोणाशी संपर्क साधला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
परमार यांनी आपल्या २० ते २५ पानी चिठ्ठीतून बिल्डरांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडली आहे. क्लिष्ट नियमांमुळे राजकीय नेत्यांसह अधिकारी, नगरसेवक अशा सर्व यंत्रणेकडून बिल्डरांना ‘बळीचा बकरा’ केले जाते. त्यामुळे आपण या ‘सिस्टीम’चे बळी ठरल्याचे त्यांनी म्हटले होते. आता त्यांना मरणोत्तर तरी न्याय मिळावा आणि इतरांना त्यांच्याप्रमाणे त्रास होऊ नये, म्हणून ठाण्यातील शेकडो बिल्डरांनी एकत्र येऊन ‘शांतता मोर्चा’ काढून न्यायाची मागणी केली. तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हा तपास आता सहायक आयुक्तांच्या स्तरावर सुरू केला आहे.
परमार यांनी कोणाकोणाशी कोणते व्यवहार केले, त्यांनी कोणाशी बोलणी केली, पालिकेतील नेमके कोणत्या अधिकाऱ्याशी किंवा नगरसेवकाशी त्यांचे काय बोलणे झाले, कोणत्या टप्प्यावर त्यांना नेमके जीवन संपवावे असे वाटले, या सर्वच प्रश्नांची चौकशी आता पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ज्या ‘गोल्डन गँग’चे या प्रकरणात नाव घेतले जात आहे, त्यांच्यापैकी नेमके कोणाशी काय बोलणे झाले, त्यांच्या मोबाइलवरील संभाषणांचीही माहिती घेण्यात येत आहे. अर्थात, त्यांच्या व्यवहारांबद्दल कुटुंबीयांकडून फारशी माहिती उपलब्ध झालेली नसल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांचे व्यवहार हाताळणारे तसेच त्यांचे पार्टनर आणि कुटुंबीयांकडून शक्य होईल तेवढी माहिती गोळा करण्यात येत असून त्यातूनच जर काही पुरावा मिळतो का, यादृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
एखाद्या गुन्ह्यात अक्षरांची जुळवाजुळव करण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत नेहमीच घेतली जाते. मात्र, खाडाखोड आणि त्यामागील नक्की कोणती अक्षरे आहेत, याची तपासणी करण्यासाठी थेट फॉरेन्सिक लॅबमधील तज्ज्ञांची मदत ठाणे पोलिसांनी घेतली आहे. अशा प्रकारे खाडाखोड केलेली नोट लॅबला पाठवण्याचा शहर पोलीस दलाच्या इतिहासातील बहुधा पहिलाच प्रकार असून ती थेट गुजरातला पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नैराश्यात किंवा एखाद्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात येतात. त्या वेळी त्या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी काही लिहून ठेवले आहे का, हे तपास करताना पोलीस प्रामुख्याने माहिती घेतात. पण, तो करताना ती नोट त्याच व्यक्तीने लिहिलेली आहे का, याची चाचपणी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून पोलीस करताना दिसतात. अशा प्रकारे परमार यांनी लिहिलेली नोट पोलिसांच्या हाती लागली.
त्यामधील पानावर केलेल्या खाडाखोडीनंतर त्या मागे नेमके काय आहे. तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून ठाणे महापालिका अधिकारी आणि नगरसेवक तसेच महापालिकेतील गोल्डन गँग असल्याचा आरोप केल्याने ती नोट फॉरेन्सिक लॅबला पाठवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला. त्यानुसार, ती थेट गुजरात येथे पाठवली आहे. तर, घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन तो अहवाल लवकर मिळावा, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.
>>> ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे प्रमुख सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील राजकीय गोल्डन गँगचा उल्लेख केल्याने आता तिचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यामुळे तिच्या सदस्यांसह सर्वच राजकीय नेत्यांमध्ये धडकी भरली आहे. विशेष म्हणजे पालिकेतील प्रत्येक मजला हा यापूर्वी गजबजलेला असायचा. आता मात्र येथे शांतता पसरली आहे. काही नेते हे नवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी पुढे येत होते. परंतु, आता तेदेखील गायब झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये या गँगचा उल्लेख करून तिच्या सदस्यांची नावेदेखील त्यांनी लिहिली होती. परंतु, ती खोडण्यात आल्याने ही नोट फॉरेन्सिक लॅबला पाठविली आहे. अद्याप त्याचा अहवाल न आल्याने राजकीय पक्षांतील बहुतेक नेत्यांमध्ये धडकी भरली आहे. जोपर्यंत हा अहवाल येत नाही, तोपर्यंत अनेक तथाकथित गोल्डन गँगचे मेंबर परागंदा झाले आहेत. यामुळे पालिका मुख्यालयातील बहुतेक मजले आता आपल्या नेत्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे दिवसभर नॉट रिचेबल राहिल्यानंतर रात्रीच्या वेळेस काही मंडळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण रिचेबल असले तरीसुद्धा ते फोन घेत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता शहरभर नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली असली तरी या ठिकाणीदेखील तथाकथित गँगमधील मंडळी मात्र गैरहजर राहिल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही मंडळी आता अहवालानंतरच रिचेबल होतील, असे सांगितले जात आहे.
>> या आत्महत्येचे भांडवल करून काही राजकीय मंडळी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन, राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ही मागणी त्यांनी केली आहे. परमार यांच्या होरायझन या गृह प्रकल्पाच्या कामात अनियमितता होती. त्याबाबत आपण महापालिकेकडे तक्रार केली होती, तसेच राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयात या प्रकल्पाच्या चुकीच्या कामासंदर्भातदेखील जनहित याचिका दाखल केल्याचे त्यांनी या निवेदनाद्वारे सांगितले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी महासभा आणि स्थायी समितीचे इतिवृत्तान्त पोलिसांना सादर केले.
परमार यांच्या प्रकल्पाविरोधातील तक्रारी, तसेच शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतच्या तक्रारींची प्रत मात्र पोलिसांना दिली नसल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.