दंतचिकित्सकाच्या मृत्यूचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:47 AM2017-07-19T02:47:56+5:302017-07-19T02:47:56+5:30
येथील पूर्व भागातील नामांकित दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती
- लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : येथील पूर्व भागातील नामांकित दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती
पोलिसांनी दिली. यामागे कौटुंबिक कारणे किंवा व्यावसायिक ताणतणाव आहेत का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
शवविच्छेदनासाठी त्यांचा व्हिसेरा पाठवल्यानंतर दोन ते तीन दिवसात त्याचा अहवाल येईल आणि त्यानंतरच तपासाला गती येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या कुटुंबीय बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अहवालानंतरच त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
डॉ. कारंडे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय सहभागी होते. डोंबिवलीतील गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रेत इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने सहभागी होणाऱ्या चित्ररथाचे ते खऱ्या अर्थाने सारथ्य करीत. त्यात बॅनर लावण्यापासून नियोजनापर्यंतची सर्व जबाबदारी ते आवडीने पार पाडत. दातांच्या सौंदर्य शस्त्रक्रियेत ते पारंगत असल्याने, विशेष प्रावीण्य मिळवल्याने त्यांना यंदाच्या वर्षी गोव्यात होणाऱ्या विशेष परिषदेत गौरविले जाणार होते.
गेल्याच आठवड्यात ते डॉक्टरांच्या समूहाने आयोजित केलेल्या पिकनिकमध्येही सहभागी होते. तेव्हाही ते मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले नव्हते. त्यांनी या पिकनिकचा मनसोक्त आनंद लुटल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
डॉ. कारंडे यांच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसल्याने इंडियन डेंटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत यापुढे मानसिक तणावाखाली किंवा कौटुंबिक अडचणीत असलेल्या डॉक्टर सहकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. त्यातून त्यांना मानसिक आधार दिला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘तोवर संयम पाळा’ : डॉ. कारंडे यांच्या आत्महत्येचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात उमटले. त्यांनी आत्महत्या केली की हा आणखी काही वेगळा आहे, हे नेमके स्पष्ट होईपर्यत त्याबाबत वृत्त पसरवू नये, असे मत त्यांच्या निकटवर्तीयांनी मांडले.