कल्याण-डोंबिवलीत पावसाची दिवसभर संततधार; नागरिकांनी घरीच राहणे केले पसंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:26 AM2020-08-29T00:26:16+5:302020-08-29T00:26:30+5:30
सरींवर सरी : सात दिवसांच्या गणेश विसर्जनाला तुरळक गर्दी, लोकलला प्रवासीही कमी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाच्या लहानमोठ्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान, पावसामुळे सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळीही सायंकाळी तुरळक गर्दी पाहायला मिळाली.
पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले. गुरुवारी रात्रीपर्यंत गौरी व गणपतींचे विसर्जन झाल्याने अनेकांनी शुक्रवारी घरूनच काम करणे पसंत केले. त्यामुळे लोकल आणि बसला प्रवासीही कमी आढळून आले. एकंदरीतच पावसामुळे सर्वत्र गर्दी कमी होती. दुपारनंतर बहुतांश ठिकाणी रस्त्यांवरील रहदारी कमी झाली होती. तर, सायंकाळी कामावर गेलेले नोकरदार मुंबईहून परतल्याने इंदिरा गांधी चौक, रेल्वेस्थानक परिसरात वर्दळ पाहायला मिळाली. तसेच शुक्रवारी सात दिवसांच्या विसर्जनावेळीही गर्दी नसल्याने ठिकठिकाणच्या गणेशघाटांवरही शांतता होती. तुरळक नागरिक गणपती विसर्जनाला येत होते. खाडीकिनारी, कृत्रिम तलाव तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांच्या ठिकाणी जास्त गर्दी नव्हती. खड्ड्यांमुळे कल्याण-शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन, पत्रीपूल, मानपाडा जंक्शन येथे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी झाली होती. तसेच पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. अनेक ठिकाणी बुजवलेले खड्डे पुन्हा पडले आहेत. त्यामुळे त्या खड्ड्यांतील खडी रस्त्यांवर इतरत्र पसरली आहे. कल्याणमधील भाजीबाजारात सकाळच्या वेळेत गर्दी होती.
मात्र, पावसाचा अंदाज घेत व्यावसायिक व ग्राहक यांनी लगबग करत खरेदीविक्री केली. एपीएमसी परिसरातही शांतता होती. फुल मार्केटमध्येही दोन दिवसांच्या तुलनेत मालाला जास्त मागणी नसल्याचे सांगण्यात आले. डोंबिवलीत पश्चिमेतील उमेशनगर, घनश्याम गुप्ते रस्त्यावर सकाळच्या वेळेत गर्दी होती. पूर्वेतील चिमणीगल्लीच्या बाजारपेठेत सकाळी ११ पर्यंत गर्दी होती. परंतु, त्यानंतर बाजार थंडावला होता. ठाकुर्लीतील बाजारात तुलनेने कमी नागरिक होते. पूर्वेला पोलीस चौकीजवळ किरकोळ सामान खरेदीसाठी नागरिक आढळून आले.
व्यापारी, रिक्षाचालकांच्या अपेक्षेवर पाणी
गणेशोत्सवात व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षा असल्याने व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. परंतु, पावसामुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. रिक्षाचालकांचाही सकाळच्या वेळेतच व्यवसाय झाला. त्यांनी पावसाचा अंदाज घेत घरी जाणे पसंत केले. दरम्यान, पावसामुळे कुठेही पाणी साचणे, झाडे पडणे, असे प्रकार घडले नाहीत.