आदिवासी मुलांच्या विकासाचे अखंड व्रत
By admin | Published: March 28, 2017 05:42 AM2017-03-28T05:42:24+5:302017-03-28T05:42:24+5:30
समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या मुलांसाठी आपण काहीतरी करावे, या हेतूने त्या फक्त आदिवासी भागात जाऊ लागल्या आणि
स्नेहा पावसकर / ठाणे
समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या मुलांसाठी आपण काहीतरी करावे, या हेतूने त्या फक्त आदिवासी भागात जाऊ लागल्या आणि हळूहळू मुलांशी मैत्री करून त्यांना अभ्यासाची, अवांतर वाचनाची आवड लावली. मराठीही धड न बोलता येणाऱ्या मुलांना शुद्ध व स्पष्ट संस्कृत शिकवले. सण-उत्सव साजरे करायला शिकवले. या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास केला आहे, तो ठाणेकर अंजली वागळे यांनी. यासाठी कोणतेही मानधन त्या स्वीकारत नसून वाड्यातील शाळेत जाण्यायेण्याचा खर्चही स्वत:च पदरमोड करून करतात. २००७ साली त्यांनी सुरू केलेल्या समाजसेवेच्या गुढीची यंदा दशकपूर्ती झाली आहे.
राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून अंजली वागळे या प्रथमच वाडा-भिवंडी रोडवरील खुपरी स्टॉपपासून तीन किमी अंतर आत असलेल्या माधवराव काणे आश्रमशाळेत गेल्या होत्या. तेथील शाळेची वास्तू टूमदार, परंतु परिसरात कोणतीही अत्याधुनिक सुविधा नाही. परिणामी, मुलं केवळ शाळेच्या व्हरांड्यात बसलेली असायची. हे पाहून या आदिवासी भागातील मुलांना के वळ अभ्यास नाही, तर सर्वच गोष्टींत पारंगत करण्याचे त्यांनी ठरवले. ठाण्याहून एसटीने त्या खुपरी येथे पोहोचून दररोज तीन किमी अंतर चालून शाळेत पोहोचायच्या. सुरुवातीला त्यांनी मुलांशी मैत्री केली, खेळ शिकवले, रद्दीपेपरपासून पेपरबॅग बनवायला शिकवले. मुलांना गोष्टी सांगू लागल्या आणि बघताबघता मुलांना या सगळ्यांत आवड निर्माण झाली. नंतर, त्यांनी मुलांना स्वखर्चातून गोष्टींची नवनवीन पुस्तके शाळेत उपलब्ध करून दिली. मुलांनी पुस्तके वाचावी, यासाठी अंजली या मुलांना अर्धवट गोष्टी सांगू लागल्या आणि कुतूहल निर्माण झाले की, त्यांना पुढील गोष्टीसाठी पुस्तकाचे नाव सांगून पुस्तक वाचायला लावत असत. हळूहळू सर्व मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली. आदिवासी भागातील मुलांना केवळ तारपा नृत्य आणि त्याची गाणी माहीत होती. मात्र, त्यांना सर्व सण-उत्सवांची माहिती देऊन मंगळागौरीचे खेळ, गरबा अंजली यांनी शिकवले. नंतर, काही मुलांनीच त्यांच्याकडे शुद्ध व स्पष्ट बोलण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांनी संस्कृत व मराठी शिकवायला सुरुवात केली.
२००७ साली आठवीपर्यंत असलेली ही आश्रमशाळा आज बारावीपर्यंत आहे. शाळेची आर्थिक स्थिती आता सुधारत असली तरी अंजली यांनी घेतलेले समाजसेवेचे व्रत आजही अखंडपणे सुरू आहे.
अंजलीच स्वत:च आयुष्य तस खडतरच. आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. पण शिकण्याची जिद्द दांडगी. चाळिशीत ती इतिहास विषय घेऊन एम.ए. झाली. त्यानंतर दोन वर्ष अभ्यास करून तिने संस्कृ तची पदविका मिळविली. हे करता करता तीन वर्षांचा पौरोहित्याचा अभ्यासक्रमही अव्वल क्रमांकाने पूर्ण केला.