धोकादायक वास्तू पाडण्याचेही कंत्राट

By admin | Published: July 28, 2016 03:42 AM2016-07-28T03:42:41+5:302016-07-28T03:42:41+5:30

आधीच मालक, बिल्डर, पालिका अधिकारी यांच्या संगनमतातून इमारती धोकादायक ठरविण्याचे रॅकेट कार्यरत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारती पाडण्याचेही

A contract to destroy dangerous buildings | धोकादायक वास्तू पाडण्याचेही कंत्राट

धोकादायक वास्तू पाडण्याचेही कंत्राट

Next

कल्याण : आधीच मालक, बिल्डर, पालिका अधिकारी यांच्या संगनमतातून इमारती धोकादायक ठरविण्याचे रॅकेट कार्यरत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारती पाडण्याचेही कंत्राटीकरण करण्याचा निर्णय गेतला आहे. इमारत पाडण्याचे काम कंत्राटदार करणार आहेत. त्यासाठीची यंत्रसामग्री पुरवणार अहेत. त्यामुळे पुनर्वसन धोरणाअभावी आधीच धोकादायक ठरलेला हा विषय नव्या धोकादायक वळणावर गेला आहे.
धोकादायक इमारतींवरील कारवाईसाठी पालिकेने कंत्राटदार नेमला आहे. या कंत्राटदारामार्फत कोणकोणत्या इमारती पाडून ग्यायच्या याचा कृती आराखडा ठरवण्याचे आदेशही प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरात लवकर धोकादायक इमारती पाडता याव्या, यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले असले तरी स्टक्चरल आॅडिटचे रिपोर्ट दडवून ठेवून इमारती धोकादायक ठरवून त्या पाडण्याची कामे पालिका अधिकाऱ्यांच्याच पुढाकाराने सुरू असल्याने कंत्राटदाराला काम मिळावे म्हणून किंवा त्याचे हितसंबंध जपले जावे म्हणून इमारती धोकादायक ठरविण्याची किंवा त्या पाडण्याची घाई केली जाईल, अशी नवी भीती निर्माण झाली आहे.
केडीएमसी हद्दीतील आठ प्रभागांपैकी सर्वात जास्त धोकादायक इमारती या कल्याणच्या ‘क’ प्रभागात आहेत. तेथे २१४ इमारती धोकादायक आहेत. यातील १३४ इमारती अतिधोकादायक आहेत. त्याखालोखाल डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ प्रभागाचा नंबर लागतो. तेथे १४८ बांधकामे धोकादायक आहेत.
यातील २६ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ह’ प्रभागात धोकादायक इमारतींचा आकडा ९० आहे. यातील ३९ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ग’ प्रभागात २४ इमारती धोकादायक, तर ३३ इमारती अतिधोकादायक आहेत.
कल्याणच्या ‘अ’ प्रभागात एकूण २१ इमारती धोकादायक आहेत. यातील ७ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ब’ प्रभागात केवळ चार इमारती धोकादायक आहेत. परंतु, अतिधोकादायक इमारतींचा आकडा या प्रभागात ३७ इतका आहे. कल्याण पूर्वेकडील ‘ड’ प्रभागात एकूण ६५ इमारती धोकादायक आहेत. यातील फक्त तीन इमारतींचे बांधकाम अतिधोकादायक आहेत. (प्रतिनिधी)

आजवर ३० इमारतींवर हातोडा
जानेवारी ते जूनदरम्यान ‘अ’ प्रभागातील पाच, ‘ब’ प्रभागातील दोन, ‘क’ आणि ‘ड’ प्रभागातील प्रत्येकी तीन, ‘फ’ प्रभागात चार, ‘ग’ प्रभागात एक; तर ‘ह’ प्रभागात १२ अशा केवळ ३० धोकादायक इमारतींवर हातोडा घालण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळयात पडझडीच्या सुरू असलेल्या घटना पाहता आता, अशा इमारती कंत्राटदारामार्फत पाडल्या जाणार आहेत.

Web Title: A contract to destroy dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.