मीरा भाईंदर पालिकेच्या स्मशानभूमीत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपासून पगार नाही
By धीरज परब | Published: April 29, 2024 09:04 PM2024-04-29T21:04:54+5:302024-04-29T21:05:12+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध स्मशानभूमी , दफनभूमीत काम करणाऱ्या ५३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्या पासूनचा पगारच ठेकेदाराने ...
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध स्मशानभूमी , दफनभूमीत काम करणाऱ्या ५३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्या पासूनचा पगारच ठेकेदाराने न दिल्याने त्यांच्यावर हलाखीची पाळी आली आहे . सोमवारी अतिरिक्त आयुक्तांच्या दालना बाहेर खाली बसून कर्मचाऱ्यांनी पगार मिळवून देण्याचे साकडे घातले .
मीरा भाईंदर महापालिकेची शहरात विविध स्मशानभूमी , दफनभूमी आहेत . त्या ठिकाणी आवश्यक असणारी कामे करण्या करता पालिकेने कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत . सदर कंत्राटी कमर्चारी शाईन ह्या ठेकेदार कंपनी मार्फत काम करतात .
सदर ठेकेदाराने कंत्राटी कर्मचारी यांचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार एप्रिल संपला तरी दिलेला नाही . आधीच तुटपुंजा पगार व त्यात दोन दोन महिने पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे . घरखर्च व मुलांचा खर्च भागवण्यासाठी अनेकांना उसने पैसे घेण्याची वेळ आली आहे .
कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने वसीम पटेल यांच्या सह कर्मचाऱ्यांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर यांची भेट घेऊन ठेकेदारास पगार देण्याचे निर्देश देण्याची विनंती केली . यावेळी मनोरकर यांनी तात्काळ ठेकेदारास कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे निर्देश दिले . तर पटेल व कर्मचाऱ्यांनी देखील ठेकेदाराने पगार देण्याचे लेखी लिहून द्यावे अशी मागणी केली .
ठेकेदार हा पालिके कडून सुमारे २० हजार रुपये प्रति कर्मचारी वेतन म्हणून घेतो . परंतु प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यास जेमतेम १३ हजार रुपयेच दिले जातात . ठेकेदाराने भविष्य निर्वाह निधी आदीची रक्कम सुद्धा भरलेली नाही . त्यामुळे अश्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे , त्याची अनामत रक्कम जप्त करावी अशी मागणी वसीम पटेल यांनी केली आहे .