पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगार वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:05 AM2018-09-02T03:05:15+5:302018-09-02T03:05:28+5:30
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे ६० कामगारांना मागील ११ महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे ६० कामगारांना मागील ११ महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात श्रमिक जनता संघाच्या वतीने पालिकेला वारंवार निवेदने देऊनही पालिकेकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाची हालचाल केली नसल्याने येत्या काळात हे कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा कामगारांनी दिला आहे.
गेल्या ११ महिन्यांपासून ६० कामगारांना पगार नसल्याने या कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातही या कामगारांना शासनाच्या धोरणानुसार किमान वेतन कायद्यानुसार पगार अदा करण्यात येत नाही. जो तुटपुंजा पगार दिला जातो, तोही महिनोन्महिने थकवला आहे. या कामगारांना जेमतेम पाच ते सहा हजार रुपये पगार मिळत आहे. त्यामुळे हे कामगार मेटाकुटीला आहेत. याचा फटका कळवा व कोपरी प्रभागांतील पाणीव्यवस्थापन विभागात काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना सर्वाधिक बसला आहे. यासंदर्भात श्रमिक जनता संघाचे सचिव जगदीश खैरालिया आणि उपाध्यक्ष संजीव साने यांनी यापूर्वी पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी आता कामगार आयुक्तांकडे दाद मागितली असून येत्या ७ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली असल्याची माहिती खैरालिया यांनी दिली. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ पालिका प्रशासनाने आणली असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुक्त दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडून केवळ तीन महिन्यांचे वेतन दिले जाणे बाकी आहे. याचा अर्थ कंत्राटदाराने पालिकेकडून कामगारांच्या वेतनाची रक्कम घेऊन ती खिशात घातली व कामगारांच्या तोंडाला पाने पुसली का, असा सवाल आहे. ठाण्यासारख्या महागड्या शहरात ११ महिने तर सोडाच, पण तीन महिनेदेखील वेतनाविना दिवस काढणे खूप कठीण आहे.
आमच्या विभागाकडून आतापर्यंत त्या कामगारांचे केवळ तीन महिन्यांचे वेतन अदा करणे शिल्लक आहे. त्यानुसार, वाढीव खर्चाचा ठराव मंजूर होणार असून लागलीच त्यांचे वेतन अदा केले जाईल. तसेच नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रियासुद्धा अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण झाल्यावर हा मुद्दा संपुष्टात येणार आहे.
- रवींद्र खडताळे, पाणीपुरवठा अधिकारी, ठामपा