म्हाडाची कंत्राट प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात; अभियंता संघटनेची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:16 AM2018-03-21T01:16:16+5:302018-03-21T01:16:16+5:30
गृहनिर्माण सोसायट्यांमधील पंप चालविण्याच्या कामासाठी काढलेल्या निविदेची वैधता संपल्यानंतरही म्हाडाने दिलेले कंत्राट वादाच्या भोव-यात सापडले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स इंजिनीअर्स असोसिएशनने या प्रकरणाची तक्रार म्हाडाच्या पदाधिकाºयांसह गृहनिर्माण मंत्र्यांकडेही केली आहे.
ठाणे : गृहनिर्माण सोसायट्यांमधील पंप चालविण्याच्या कामासाठी काढलेल्या निविदेची वैधता संपल्यानंतरही म्हाडाने दिलेले कंत्राट वादाच्या भोव-यात सापडले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स इंजिनीअर्स असोसिएशनने या प्रकरणाची तक्रार म्हाडाच्या पदाधिकाºयांसह गृहनिर्माण मंत्र्यांकडेही केली आहे.
महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स इंजिनीअर्स असोसिएशनच्या लेखी तक्रारीनुसार, म्हाडाने १६ आॅक्टोबर २0१७ रोजी तीन निविदा उघडल्या होत्या. या निविदांची ९0 दिवसांची वैधता १४ जानेवारी २0१८ रोजी संपली. या वैध कालावधीमध्ये म्हाडाने कुणालाही निविदेचे काम दिले नाही. त्यानंतर कोणताही शासकीय आदेश किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीमध्ये कोणतीही तरतूद नसताना म्हाडाने निविदेची वैधता आणखी ९0 दिवसांनी वाढवली. अशीच मुदतवाढ निविदा सादर करण्यासही देण्यात आली. निविदा प्रक्रिया जिवंत ठेवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराशी मोठा व्यवहार झाला असावा, असा आरोप संघटनेने केला आहे.
पंपांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी ते ‘तातडीचे काम’ असल्याचा अभिप्राय टाकून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या खर्चाच्या नोंदीही म्हाडाकडून सांभाळल्या जात
नाहीत.
म्हाडाच्या दुरुस्ती मंडळ आणि झोपडपट्टी सुधार मंडळाप्रमाणेच विद्युत विभागातही मोठ्या प्रमाणात अनागोंदी असून, एकाच कामाचे नाव बदलून दोन वेळा बिल काढण्याचे प्रकारही होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
निविदा सूचना संकेतस्थळावर नाही
६२ हजार ५00 ते ३ लाख रुपयांपर्यंतची कामे साध्या निविदा प्रक्रियेद्वारे (ई-निविदा नव्हे) केली जातात. आधी या कामांसाठी वृत्तपत्रांमध्ये निविदा सूचना प्रसिद्ध करणे अनिवार्य होते. त्या वेळी अशा निविदा सूचना कुणाच्याही वाचण्यात येणार नाहीत, अशा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जायच्या.
सध्याच्या नियमानुसार कार्यकारी अभियंता किंवा निविदा जारी करणाºया अधिकाºयाने निविदा सूचना फलकावर लावणे अपेक्षित आहे. मात्र, निविदेची कोणतीही सूचना म्हाडा स्वत:च्या संकेतस्थळावर कधीच अपलोड करत नसून म्हाडामध्ये काय सुरू आहे हे सांगण्यासाठी हा प्रकार स्वयंस्पष्ट असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.