कचरा उचलण्याचा ठेका बहुमताने मंजूर

By admin | Published: January 21, 2016 02:34 AM2016-01-21T02:34:24+5:302016-01-21T02:34:24+5:30

अंबरनाथ नगरपरिषदेच्या बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापनेचा ठेका पालिका सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला.

The contract to pick up the garbage is approved by the majority | कचरा उचलण्याचा ठेका बहुमताने मंजूर

कचरा उचलण्याचा ठेका बहुमताने मंजूर

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापनेचा ठेका पालिका सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला. एकूण १७ कोटींची ही निविदा असून त्यात कचरा उचलण्याकरिता ६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही निविदा मंजूर झाल्याने शहरातील प्रत्येक प्रभागातील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी मिळणार आहे. सोबत अतिरिक्त कामगारही मिळणार आहेत.
अंबरनाथ पालिकेचा कचरा उचलण्याचा ठेका २००९-१०मध्ये अंबरनाथच्या मे.पनवेलकर यांना देण्यात आला होता. या कामासाठी ५ वर्षांची मुदत होती. ही मुदत मार्च २०१५ मध्ये संपली असून या कामासाठी नवीन निविदा मागविण्यात येणार होती. मात्र निविदा काढण्याबाबत एकवाक्यता नसल्याने निविदा प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे पनवेलकर यांनाच मुदतवाढ देत हे काम करण्यात येत आहे. अखेर मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी निविदेचा आराखडा तयार करुन त्याची मंजुरी सभागृहात घेतली.
निविदा प्रक्रियेमध्ये चार ठेकेदारांनी आपल्या निविदा भरल्या होत्या. मात्र त्यातील विद्यमान ठेकेदार पनवेलकर यांची निविदा कागदपत्रांची पूर्तता नसल्याने रद्द करण्यात आली. उर्वरीत तीन ठेकेदारांच्या निविदा उघडण्यात आल्या. या निविदेसाठी समिक्षा कंस्ट्रक्शन कंपनी यांनी १७ कोटी ४७ लाख रुपये किमतीची निविदा भरली होती. तर प्रतिस्पर्धी आर अँड बी इन्फ्रा यांनी १७ कोटी ९१ लाखांची तर बी.व्ही.जी. इंडिया या कंपनीने २० कोटी ८० लाख रुपये किमतीची निविदा होती. सर्वात कमी दराची निविदा समिक्षा कंस्ट्रक्शन कंपनीची असल्याने ही निविदा पालिका सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. या निविदेवर चर्चा करतांना शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांनी निविदेमधील त्रुटी सभागृहासमोर आणून निविदा परत मागविण्याची मागणी केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र शिवसेनेच्याच नगरसेवकांनी ठरावाला विरोध असल्याचे सांगन हा विषय मताला टाकण्याची मागणी केली. नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी हा विषय मताला टाकल्यावर ठरावाच्या विरोधात सेनेचे अब्दुल शेख, छाया दिवेकर, शरिफा शेख, यांच्यासह भाजपाचे सुनील सोनी आणि राष्ट्रवादीचे उमर इंजिनीअर यांनी मतदान केले. तर भाजपाच्या इतर नगरसेवकांनी आणि मनसेच्या दोन नगरसेविकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. उर्वरीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पडली आहे. निविदेत ठेकेदाराने दिलेले दर हे शासकीय दरापेक्षा कमी आहेत. तसेच कचरा उचलण्याचे काम आणि कामगार पुरविण्याचे काम हे दोन्ही विषय वेगळे आहेत. शहरात स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रशासनाने हा प्रयत्न केलेला आहे.
- गणेश देशमुख,
मुख्याधिकारी,
अंबरनाथ

Web Title: The contract to pick up the garbage is approved by the majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.