कंत्राटी कामगार तीन महिने वेतनापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:02 AM2019-09-16T00:02:07+5:302019-09-16T00:02:18+5:30
भिवंडी महापालिकेत पाणीपुरवठा विभागात व्हॉलमनचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही.
अनगाव : भिवंडी महापालिकेत पाणीपुरवठा विभागात व्हॉलमनचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही. या कामगारांना त्वरित पगार न दिल्यास तसेच संघटनेच्या सभासद कामगाराला कमी न करता नवीन कंत्राटात प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे तसे न केल्यास आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
१५ वर्षापासून पाणीपुरवठा विभागात व्हॉलमन, फिल्टर म्हणून काम करणाºया कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळावे म्हणून श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन केल्यानंतर जून महिन्यात किमान वेतन मंजूर करण्यात आले. कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळावे, ओळखपत्रासह इतर सोईसुविधा मिळाव्यात यासाठी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या सोबत २१ जून रोजी बैठक झाली होती. त्यावेळी जुलै महिन्यापासून कामगारांना किमान वेतन तसेच नवीन कंत्राटात संघटनेच्या कुठल्याही कामगाराला कमी न करता त्यांना समाविष्ट करण्यात येईल अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांना हिरे यांनी दिल्या होत्या. त्यानंतरही कामगारांचा पगार मिळालेला नाही. तत्कालीन आयुक्त अशोककुमार रणखांब यांनाही निवेदन देऊन बैठक झाली होती. तेव्हाही आयुक्तांनी संघटनेची मागणी मान्य करत तशी सूचना कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता संदीप पटनावर यांना केली होती. मात्र त्याची अमलबजावणी अधिकाºयांनी केली नाही. त्यांच्या भेटी घेतल्यानंतर पाइपलाइन दुरूस्तीचे काम करणाºया कामगारांना दोन महिन्याचा पगार आॅगस्टमध्ये दिला. मात्र व्हॉलमन कामगांराना तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही.
दरम्यान, आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अधिकाºयांना पुन्हा आदेश द्यावेत, कामगांराचे वेतन त्वरित देण्यात यावे, कामगारांना नवीन कंत्राटामध्ये समाविष्ट करून घ्यावे आदी मागण्या संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांनी केली आहे.