कंत्राटी सफाई कामगारांचा ‘ठिय्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:38 AM2018-12-04T00:38:20+5:302018-12-04T00:38:23+5:30
केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कंत्राटी कामगारांंचा दोन महिन्यांचा पगार थकल्याने कामगारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली.
कल्याण : केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कंत्राटी कामगारांंचा दोन महिन्यांचा पगार थकल्याने कामगारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राजेश उज्जैनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. विशाल एक्स्पर्ट या कंत्राटदार कंपनीने कचरावाहू वाहनांवर ४०३ कामगार नेमले आहेत. महापालिका या कंपनीची बिले नियमित अदा करत असून काही कामगारांना वेतन देत आहे. मात्र, मनसेच्या कामगार संघटनेशी संबंधित २५० कामगारांना आकसातून पगार दिला जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. कंत्राटदाराच्या मनमानीमुळे २० नोव्हेंबरला कामगारांनी कंपनीच्या कर्णिक रोडवरील कार्यालयाला टाळे ठोकले होते. त्यानंतरही कंत्राटदाराने काहीच प्रतिसाद न दिल्याने कामगारांनी मुख्यालयाच्या प्रवेसद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
उज्जैनकर म्हणाले की, कामगार हमीपत्र देण्यास तयार आहेत. महापालिकेकडून हमीपत्राचा नमुनाच दिला जात नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता महापालिकेला कामाच्या बिलासोबत ४०३ कामगारांची यादी जोडली असल्याचे समजते. कामगारांच्या हजेरी शेडमध्ये १२५ कामगारच दाखवले आहेत.
यासंदर्भात कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आयुक्त संतप्त झाले. कंत्राटदाराने कामगारांचा पगार दिला पाहिजे. कंत्राटी कामगार हे महापालिकेचे नसून कंत्राटदार कंपनीकडे कामाला आहेत. कंत्राटदाराला महापालिकेने बिल अदा केलेले आहे. तरीदेखील कंत्राटदार पगार देत नसल्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी आरोग्य खात्यातील अधिकारी विलास जोशी यांना दिले आहे.
>‘पगारातील सात हजार गेले कुठे ?
महापालिका करारानुसार पगारासाठी वाहनचालकाला १७ हजार ५७० रुपये, तर सफाई कामगारांसाठी १८ हजार ४१६ रुपये देते. कंत्राटदार मात्र प्रत्येकी १० हजार १३६ रुपयेच पगार अदा करत आहे. पाच टक्के सेवाकर आकारला तरी सफाई कामगाराला १७ हजार रुपये हाती यायला हवेत. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. मग, वरचे सात हजार कुठे जातात, असा सवालही उज्जैनकर यांनी केला आहे.