कंत्राटी कामगारांना मार्च अखेर मिळणार थकबाकीचा तिसरा हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:47+5:302021-03-17T04:41:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना थकीत रकमेचा न मिळालेला तिसरा हप्ता मार्च अखेरीस देण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना थकीत रकमेचा न मिळालेला तिसरा हप्ता मार्च अखेरीस देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. त्याचबरोबर उर्वरित दोन हप्ते २०२२ पर्यंत अदा केले जाणार आहेत. यासंदर्भात म्युनिसिपल लेबर युनियनने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
फेब्रुवारी २०१५ रोजीच्या शासन आदेशानुसार, ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा लागू करून त्याची थकबाकी अदा करण्याचा मुद्दा तत्कालीन कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्याकडे झालेल्या बैठकीत युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी उपस्थित केला होता. याच बैठकीत त्यांनी ठामपा कंत्राटी कामगारांना शासकीय आदेशानुसार किमान वेतन लागू करण्याचे व त्याची थकबाकी अदा करण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते. युनियनच्या प्रयत्नामुळे नोव्हेंबर २०१६ पासून या कामगारांना किमान वेतन लागू केले. तसेच २४ फेबुवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीतील थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात अदा करण्याचे प्रशासन व युनियन यांच्यात ठरले होते. त्यापैकी दोन हप्त्यांचे वाटप करण्यात आले. मार्च २०२० पर्यंत तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरले होते. परंतु कोरोनामुळे हा हप्ता अदा करण्यात आला नव्हता. कामगार नेते राव यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेत कामगारांची थकबाकी अदा करण्याची विनंती केली. आयुक्तांनीदेखील सकारात्मक भूमिका घेत ठाणे मनपा कंत्राटी कामगारांना थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप मार्चअखेर करण्याचे मान्य केले. तसेच उर्वरित दोन हप्तेसुध्दा २०२२ पर्यंत देण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे कामगार राव यांनी सांगितले.
........
वाचली