ठेकेदार भाजपा महिला मंत्र्यांचाच
By admin | Published: July 9, 2017 01:52 AM2017-07-09T01:52:01+5:302017-07-09T01:52:01+5:30
राज्य मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री व सत्ताधारी भाजपाच्या सहकारी पक्षाचा एक मंत्री राधेश्याम कथोरिया याला परिवहन सेवेचे कंत्राट मिळावे याकरिता फोन करीत
लोकमत न्यूज नेटवर्क
भाईंदर : राज्य मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री व सत्ताधारी भाजपाच्या सहकारी पक्षाचा एक मंत्री राधेश्याम कथोरिया याला परिवहन सेवेचे कंत्राट मिळावे याकरिता फोन करीत असल्याचा पलटवार सेनेने केला आहे. आ. मेहता यांनी पोलिसांना पकडून दिलेला लाच प्रकरणातील लिपीक आनंद गबाळे हा मेहता यांच्याच कर्मचारी संघटनेचा सदस्य आहे, याकडे सेनेने लक्ष वेधले. भाजपाच्या अंतर्गत राजकारणातून ठेकेदाराला अटक करवण्यात आल्याचे शिवसेनेचे मत असून अन्य पक्षांना लाच दिल्याचा दावा हा अन्य पक्ष व नेते यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत सेना आ. प्रताप सरनाईक म्हणाले की, आ. मेहतांनी हिंमत असेल तर लाच घेणाऱ्यांची नावे जाहीर करावी. निवडणुकीच्या तोंडावर असले हीन प्रकार करुन राजकीय फायदा घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. सत्य काय ते पोलीस चौकशीत बाहेर येईलच. उगाच आरोप करणे चुकीचे आहे.
मीरा-भाईंदर शहरात सर्वात भ्रष्टाचारी, मनमानी करणारा कोण नेता आहे, असे शेमड्या पोराला जरी विचारले तर तो एकाच व्यक्तीचे नाव सांगेल, असा टोला काँग्रेस नगरसेवक प्रमोद सामंत यांनी आ. मेहता यांना नामोल्लेख न करता लगावला.
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेतील टक्केवारीच्या राजकारणाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्य सरकारने नंदलाल समिती नियुक्ती करून चौकशी केली होती. आता मीरा-भाईंदर महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
महापालिकेत भ्रष्टाचार वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. ई-टेंडरींग पध्दत लागू करुन कामकाजात खऱ्या अर्थाने पारदर्शकता आणायला हवी.
- गीता जैन,
महापौर, मीरा-भाईंदर महापालिका
महापालिकेत भ्रष्टाचार वा टक्केवारीचे राजकारण चालत नाही. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार व कर्मचारी या दोघांना अटक केली असून तपास सुरु आहे. अंतिम निष्कर्ष आल्यावर बोलणे उचित होईल.
- डॉ. नरेश गीते,
आयुक्त मीरा-भाईंदर महापालिका