कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न करणारा ठेकेदार काळ्या यादीत

By अजित मांडके | Published: September 12, 2023 05:03 PM2023-09-12T17:03:05+5:302023-09-12T17:03:53+5:30

या सगळ्यांचा विचार करून करारनाम्यातील अटीनुसार कारवाई करण्यात आली आहे

Contractor blacklisted for not depositing provident fund of contractual sanitation workers | कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न करणारा ठेकेदार काळ्या यादीत

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न करणारा ठेकेदार काळ्या यादीत

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील सफाई व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाºयाची देणी थकविल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने मे. कल्पेश एंटरप्रायझेस, नवी मुंबई या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे त्याला पुढील तीन वर्षे ठाणे महापालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. महापालिकेकडे जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील गट क्रमांक १८ मधील रस्ते साफसफाईचे कंत्राट या कंत्राटदाराकडे होते. त्या गटात काम करणाºया कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे अंशदान कपात करून त्यात कंत्राटदाराकडील अंशदानाची रक्कम एकत्रित करून भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये भरणे बंधनकारक आहे. या गटात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्याचे किमान वेतन व एप्रिल-२०२२ पासूनची देणी प्रलंबित होती. तसेच, कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना साहित्य व सुरक्षा साहित्य साधने उपलब्ध करून दिली गेली नाहीत. यासंदर्भात देण्यात आलेल्या नोटीसीचा खुलासाही सादर करण्यात आला नाही. वारंवार संधी देऊनही या कंत्राटदाराच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्याचा महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या कामकाजावर तसेच, महापालिकेच्या प्रतिमेवर विपरित परिणाम तर झालाच, शिवाय, सफाई कामगार त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिले.

या सगळ्यांचा विचार करून करारनाम्यातील अटीनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, कंत्राटदाराने भरलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षे या कंत्राटदारास ठाणे महापालिकेच्या कोणत्याही प्रकारच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. गट क्रमांक १८ मधील ज्या कंत्राटी सफाई कामगारांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने थकित आहेत ती, कंत्राटदारांची शिल्लक देयके आणि सुरक्षा अनामत रक्कम यांच्यातून वळती करून संबंधित प्राधिकरणांकडील कामगारांच्या खात्यात महापालिका जमा करेल. तसेच, त्यांचे  थकित वेतन अदा करण्याबाबतच्या कंत्राटातील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी, मे-२०२२मध्ये कंत्राटदाराविरुद्ध भविष्य निर्वाह निधी कार्यालय, वाशी यांनी प्रोहिबीटरी आदेश दिला होता. त्यानुसार, एकूण ३२ लाख ६९ हजार ५०४ रुपये कंत्राटदाराच्या मासिक बिलातून वळते करून ठाणे महापालिकेने त्या रकमेचा भरणा निर्वाह निधी कार्यालय, वाशी यांच्या कार्यालयात केला होता. जानेवारी-२०२३ आणि फेब्रुवारी-२०२३मध्येही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा भरणा न केल्याबद्दल ठाणे महापालिकेने संबंधित कंत्राटदारास नोटीस काढली होती. पाठपुरावा केल्यावरही कंत्राटदाराने मार्च-२०२२पर्यंतचीच प्रदाने भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा केली. अखेर, घनकचरा विभागाने कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही केली. तसेच, कंत्राटी कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याशिवाय कंत्राटदारांची मासिक देयके अदा केली जाऊ नयेत, असे स्पष्ट निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

Web Title: Contractor blacklisted for not depositing provident fund of contractual sanitation workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.