उल्हासनगरात ठेकेदाराच्या हलगर्जीपणा, विजेचा खांब पडला; १९ तास वीज गुल, गुन्हा होणार दाखल
By सदानंद नाईक | Published: January 20, 2023 04:06 PM2023-01-20T16:06:46+5:302023-01-20T16:08:34+5:30
कॅम्प नं-२ हिरा मॅरेज हॉल व मार्केट परिसरात विजेचा खांब पडून तब्बल १९ तास वीज पुरवठा खंडित झाला.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-२ हिरा मॅरेज हॉल व मार्केट परिसरात विजेचा खांब पडून तब्बल १९ तास वीज पुरवठा खंडित झाला. नाली दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे विजेचा खांब पडल्याचा ठपका महावितरण अधिकाऱ्यांनी ठेवून गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता नितीन काळे यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील हिरा मॅरेज हॉल समोरील नालीच्या दुरुस्तीचे काम महापालिका ठेकेदार करीत आहे. नाली दुरुस्तीचे काम सुरू असताना बुधवारी सायंकाळी विजेचा खांब खाली पडला. सुदैवाने वर्दळीने ठिकाणीं कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विजेचा खांब पडल्याने, हिरा मॅरेज हॉल व मार्केट परिसरातील वीज पुरवठा तब्बल १९ तास खंडित झाला. याप्रकारने व्यापारी व नागरिकांनी महावितरण कामाबाबत नाराजी व्यक्त केली. गुरवारी वीज पुरवठा नियमित केल्यावर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन काळे यांनी महापालिका नाली दुरुस्ती करतांना काळजी न घेतल्याने, विजेचा खांब पडल्याचा ठपका ठेवला. पडलेल्या विजेच्या खांबासह इतर खांब वाकून विधुतवाहिन्या तुटल्याने, महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता काळे यांनी दिली.
महापालिका नाली दुरुस्ती वेळी शेजारील विजेच्या खांबा खालील माती काढल्याने, विजेचा खांब पडला. या अपघातात जिवंत विधुतवाहिन्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता महावितरण विभागाने व्यक्त केला. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र नवीन विजेचा खांब बसवून विधुत पुरवठा नियमित करण्यात आला. मात्र हलगर्जीपणाने विजेचा खांब पडल्याने, ठेकेदाराकडून नुकसान भरपाईसह गुन्हा दाखल करण्याचे संकेत कार्यकारी अभियंता नितीन काळे यांनी दिल्याने, इतरांचे धाबे दणाणले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"