मीरा भाईंदर मनपा आयुक्तांचा आदेश धाब्यावर; ठेकेदारानं काम करुनच दाखवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 06:09 PM2022-01-16T18:09:40+5:302022-01-16T18:09:50+5:30

पदपथावर कामाची सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी विरोध सुरु केला आहे. ह्या बांधकामामुळे यायला जायला अडथळा कायमचा होणार आहे

The contractor did the work after Mira Bhayander Municipal Commissioner's order against him | मीरा भाईंदर मनपा आयुक्तांचा आदेश धाब्यावर; ठेकेदारानं काम करुनच दाखवलं

मीरा भाईंदर मनपा आयुक्तांचा आदेश धाब्यावर; ठेकेदारानं काम करुनच दाखवलं

Next

मीरारोड - भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका जवळ बालाजी नगरच्या पदपथावर नागरिकांचा मार्ग अडवून चाललेल्या तब्बल १३ लाख ३५ हजार रुपयांच्या सेल्फी पॉईंटचे बांधकाम थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते . परंतु आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ठेकेदाराने प्लास्टरचे काम उरकले. 

रस्ते व पदपथ हे नागरिकांना ये - जा करण्यासाठी मोकळे ठेवणे आवश्यक आहे . बालाजी नगर भागात भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकातून ये - जा करणाऱ्या तसेच भाईंदर पूर्व - पश्चिम पादचारी पुलावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे . येथील रस्ता अरुंद असून रस्त्याच्या एकाच बाजूला पदपथ आहे . येथे शेअर रिक्षा उभ्या रहात असतात . त्यामुळे पदपथ व रस्ता मोकळा असणे नागरिकांची गरज आहे . तसे असताना  पदपथावर महापालिकेने नगरसेविका रिटा शाह यांच्या मागणीवरून वॉल गार्डन अर्थात सेल्फी पॉईंट मंजूर केले आहे . नगरसेवक निधीतून १३ लाख ३५ हजार रुपयांचे कंत्राट श्री गणेश इंटरप्रायझेस ह्या ठेकेदारास दिले आहे.  

पदपथावर कामाची सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी विरोध सुरु केला आहे. ह्या बांधकामामुळे यायला जायला अडथळा कायमचा होणार आहे. शिवाय खालील गटाराचे चेंबर देखील बंद करून टाकल्याने सफाई आदींचा प्रश्न उभा राहणार आहे . आयुक्त दिलीप ढोले यांनी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ व कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना पाहणी साठी पाठवले . जागेची प्रत्यक्ष पाहणी आयुक्त करून अंतिम निर्णय घेणार असल्याने ठेकेदारास काम थांबवण्याचे आदेश दिल्याचे अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी सांगितले . बारकुंड यांनी तसे कनिष्ठ अभियंता संदीप साळवे यांना निर्देश दिले होते . परंतु तसे असून देखील ठेकेदाराने आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून शनिवारी प्लास्टरचे काम पूर्ण केले. उलट ठेकेदाराने दोन ऐवजी चार कर्मचारी लावले व सायंकाळ पर्यंत काम उरकले हे विशेष . त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे . 

Web Title: The contractor did the work after Mira Bhayander Municipal Commissioner's order against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.