कंत्राटदार उचलणार कचरा; केडीएमसीचे कर्मचारी अपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:58 AM2018-09-15T02:58:36+5:302018-09-15T02:59:05+5:30
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कचरा उचलण्याचे काम महापालिकेचे सफाई कामगार करतात. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे. खाजगीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच महासभेत मंजूर झाला आहे.
महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. मात्र, महापालिकेचे सफाई कामगार कमी आहेत. त्यामुळे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत. महापालिकेच्या दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडून करण्यासाठी निविदा मागवली आहे. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार प्रतिकिलो अथवा मेट्रीक टनामागे किती दर आकारणार, त्याचा तपशील कंत्राटदाराने नमूद करावा, असे महापालिकेने निविदेत म्हटले आहे. कमी दराच्या निविदाधारकास हे काम दिले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वीही कचरा खाजगीकरणाची निविदा काढली होती. मात्र, तिला दोनच कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निकोप स्पर्धा झाली नाही. आता पुन्हा नव्याने दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे. या निविदेला दोघांचा प्रतिसाद मिळाल्यास आणि दर कमी असलेल्या कंत्राटदारास कंत्राट दिले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडे २२०० सफाई कामगार आहे. सरकारच्या निकषानुसार एक लाख लोकसंख्येसाठी ५०० सफाई कामगार हवेत. परंतु, या निकषात सरकारने फेरबदल करून एक लाख लोकसंख्येसाठी २५० सफाई कामगार हवेत, असा निकष जाहीर केला. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख, तर २७ गावांची लोकसंख्या तीन लाख होती. २७ गावे महापालिकेत आल्याने महापालिकेची लोकसंख्या १५ लाख झाली. जनगणना होऊन सात वर्षे उलटून गेली. दरम्यानच्या काळात वाढलेली लोकसंख्या पाहता महापालिका हद्दीत आजमितीस १८ लाख लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेत तीन हजार ७०० सफाई कामगार, तर १८ लाखांच्या लोकसंख्येनुसार सध्या साडेचार हजार सफाई कामगार हवेत. नवी भरतीअभावी हा निकष सरकारी आदेशानुसार केवळ कागदावरच आहे. सफाई कामगार कमी असल्याने कचरा उचलण्याच्या कामावर ताण पडतो.
महापालिकेकडे कचरा उचलून नेण्यासाठी ६० वाहने आहेत. आणखी १६ वाहनेखरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या १६ गाड्यांच्या खरेदीवर अडीच कोटी खर्च होणार आहेत. सध्याच्या ६० कचरावाहक गाड्यांपैकी काही गाड्या भंगार झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.
कर्मचारी अन्य प्रभागांत वळवणार
पाच प्रभाग क्षेत्रांतील खाजगीकरण झाल्यास तेथील कामगार अन्य पाच प्रभाग क्षेत्रांत सफाईसाठी वळवले जातील. अपुºया मनुष्यबळाअभावी सध्या २७ गावांत योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही.
महापालिका कचरा उचलण्याच्या कामावर वर्षाला १२ कोटी रुपये खर्च करते. पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे खाजगीकरण झाल्यास त्यावर जवळपास आठ ते दहा कोटी रुपये खर्च होऊ शकतो.