कोरोनाकाळात रुग्णवाहिका भाडेठेक्यात ठेकेदाराची ‘बरकत’; ११ महिन्यांसाठी ४ कोटी ९८ लाख
By धीरज परब | Published: March 18, 2024 01:16 PM2024-03-18T13:16:21+5:302024-03-18T13:17:06+5:30
महत्त्वाची बाब म्हणजे हे सारे व्यवहार शासन दर डावलून करण्यात आले
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: कोरोना काळात शासनाने आयसीयू वा वातानुकूलित रुग्णवाहिकेची १ हजार १९० रुपये भाडेदर निश्चित केला होता. असे असताना महापालिकेने मात्र ठेकेदारास १ हजार ८०० रुपयांनी भाडे देऊन ‘बरकत काॅन्ट्रॅक्टर्स’ या ठेकेदारास ११ महिन्यांचे ४ कोटी ९८ लाख रुपये देऊन चांगलीच ‘बरकत’ केल्याचे उघडकीस आले आहे.
कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालय वा कोविड केअरमध्ये ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज होती. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणच्या १९ जून २०२० रोजीच्या बैठकीत रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले होते. त्यात २५ किमी अंतर किंवा २ तासांकरिता आयसीयू अथवा वातानुकूलित रुग्णवाहिकेचे भाडे १ हजार १९० रुपये, तर २५ किमी वा २ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यास प्रतिकिमी २४ रुपये निश्चित केले होते.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या सौरभ अग्रवाल यांच्या बरकत कॉन्ट्रॅक्टर्स नावाच्या कंपनीने २ जुलै २०२० रोजी मीरा भाईंदर महापालिकेस पत्र देत कोरोना बाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या शासकीय दराप्रमाणे रुग्णवाहिका पुरवठा करण्यास इच्छुक आहोत, असे पत्र २०१३ सालच्या मंजूर नसलेल्या दरासह दिले होते.
त्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या पत्रावर प्रस्ताव तयार करून बरकत कॉन्ट्रॅक्टरकडून भाड्याने रुग्णवाहिका घेण्यास त्याने दिलेल्या दरानुसार मंजुरी दिली. ३ जुलै रोजी बरकत कॉन्ट्रॅक्टरला १२ रुग्णवाहिका पुरवठा करण्याचे कार्यादेश तत्कालीन अतिरिक्त आयुक्त महेश वरूडकर यांनी दिले.
प्रतीक्षा काळ म्हणून मोजले लाखो रुपये
- पालिकेने १९ जून २०२०च्या मंजूर असलेल्या दराऐवजी मंजूर नसलेल्या दरानुसार ठेकेदारास १० किमीपर्यंत वातानुकूलित वा आयसीयू रुग्णवाहिकेसाठी १ हजार ८०० रुपये तर प्रतीक्षा काळाच्या प्रत्येक तासाला १०० रुपये प्रमाणे कंत्राट दिले.
- त्यानुसार ३ जुलै २०२० ते ८ जून २०२१ या काळात बरकत कॉन्ट्रॅक्टरला पालिकेने रुग्णवाहिका भाडे पोटी ४ कोटी ९८ लाख १९ हजार रुपये अदा केले.
- त्यात ठेकेदारास प्रतिफेरीप्रमाणे भाडे देण्यात आलेच शिवाय रुग्णवाहिकेचा प्रतीक्षा काळ म्हणून सुद्धा लाखो रुपये मोजले.
- याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी रुग्णवाहिका भाडे घोटाळ्याबद्दल पालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे तक्रार केली आहे.