बिले घेण्यासाठी कंत्राटदारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:25 AM2019-04-05T02:25:17+5:302019-04-05T02:25:21+5:30
अंबरनाथ पालिका : अधिकारीही जुंपले कामात
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत दोन दिवसांपासून कंत्राटदारांनी बिले काढण्यासाठी घाई सुरू केली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील बिले देण्यासाठी पालिकेने आर्थिक तरतुदीनुसार बिले काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून नागरिकांपेक्षा कंत्राटदारांची गर्दी कार्यालयात दिसत आहे. तर, जास्तीतजास्त बिल निघावे, यासाठी कंत्राटदारांची लॉबी काम करत आहेत.
नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पालिकेतील कंत्राटदारांनी प्रलंबित बिल मिळावे, यासाठी लागलीच पाठपुरावा सुरू केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून जे ३४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे, त्याच्यावर डोेळा ठेवत कंत्राटदारांनी आणि या कंत्राटदारांना पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. अनेकांची प्रलंबित बिले लागलीच मिळावीत, यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. जुन्या अर्थसंकल्पातील ज्या तरतुदी शिल्लक आहेत, ते बिल घेण्यासाठी पालिकेत धावाधाव सुरू आहे. पालिकेतील अर्थ विभागही याच कामात व्यस्त झाला आहे.
नियमानुसार बिल काढण्याचे प्रयत्न पालिकेच्या वतीने सुरू आहे. तर, दुसरीकडे राजकीय दबावाला बळी न पडता नियमाप्रमाणे बिल काढण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत कोणत्या कंत्राटदाराला कितीचे बिल दिले आणि कोणती लॉबी यशस्वी झाली, हे बिल मंजूर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.
अर्थसंकल्पच मंजूर नाही
दुसरीकडे पालिकेचा नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अजूनही जिल्हाधिकाºयांनी मंजूर केलेला नाही. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर त्यानुसार अनेक बिले द्यावी लागणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर होण्याआधी ज्या कंत्राटदारांना बिल मिळणार नाही, त्या कंत्राटदारांना नवीन अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर मे महिन्यात बिल दिले जाणार आहे.