सांगलीच्या वाचनालयाला दिली ग्रंथभेट; वाचकांनी केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:28 AM2019-09-27T00:28:34+5:302019-09-27T00:28:47+5:30
सार्वजनिक वाचनालयाकडून तीन हजार पुस्तके
कल्याण : अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे तेथील जिल्हा नगर वाचनालयाचे मोठे नुकसान झाले होते. या वाचनालयाला कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने मदतीचा हात देत जवळपास तीन हजार पुस्तके नुकतीच भेट दिली आहेत. या पुस्तकांची किंमत जवळपास दोन लाख ७० हजार रुपये आहे.
सांगली जिल्हा नगर वाचनालय हे १५० वर्षे जुने आहे. सांगली शहराला बसलेल्या पावसाच्या तडाख्यात या वाचनालयातील जवळपास ९० हजार पुस्तके खराब झाली. अशा वाचनालयास मदत करून वाचनसंस्कृती टिकून राहावी, याकरिता मदत करणे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून कल्याण सार्वजनिक वाचनालयाने कल्याणमधील वाचकांना आपल्याकडील जुनी पुस्तके वाचनालयात देण्याचे आवाहन केले होते. वाचकांनी त्याला प्रतिसाद देत आपल्याकडील जुनी-नवीन पुस्तके, संदर्भग्रंथ भेट म्हणून दिली.
पवई येथील चैत्राली जोगळेकर, कवी विजय जोशी, डोंबिवलीच्या श्रद्धा वझे अशा जवळजवळ ६० वाचकांनी त्यांच्याकडील अडीच हजार पुस्तके तसेच सार्वजनिक वाचनालयांनी आपल्याकडील ५०० पुस्तके, अशी जवळपास तीन हजार पुस्तके वाचनालयास देणगी म्हणून दिली. या कामात वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, चिटणीस आशा जोशी, ग्रंथपाल गौरी देवळे, भिकू बारस्कर यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पुस्तक दान करण्याचे आवाहन
सांगलीतील महापुरामुळे जिल्हा वाचनालयाचा पहिला मजला पाण्यात होता. त्यामुळे हजारो ग्रंथ पाण्यात राहिल्याने खराब झाले. या ग्रंथालयाला आर्थिक मदतीबरोबर दुर्मिळ पुस्तकांचीही आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रंथ दान करा, असे आवाहन ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाने केले आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालय स्वत: पाच हजारांहून अधिक पुस्तके देणार आहे. वाचकांनीही या ग्रंथालयाला मदत करण्यासाठी सुस्थितीतील पुस्तके, ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, कोष इत्यादी ग्रंथसंपदा दान करावी. ही पुस्तके मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुख्य शाखेत सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत जमा करावीत.