वाहन चालकाने सजगतेने नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण शक्य होईल- विवेक फणसळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:01 PM2020-01-13T22:01:50+5:302020-01-13T22:16:03+5:30
प्रत्येक जीव मोलाचा आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळा आणि वेगावर तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवा, असे कळकळीचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घघाटन कार्यक्रमात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहन चालकांनी सजगतेने नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल. त्यातून अपघातांमध्ये जखमी आणि मृत पावणाऱ्यांची संख्याही कमी होईल. त्यामुळे सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळा आणि वेगावर नियंत्रण ठेवा असे कळकळीचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी वाहतूक शाखेच्या कार्यक्रमात केले.
रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना फणसळकर यांनी हे आवाहन केले. यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना आपल्या व्यस्त कामातूनही मदत करणाºया नागरिकांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करतांना सुरुवातीलाच आयुक्तांनी वाहतूकीचे नियम पाळण्याची शपथ विद्यार्थ्यांसह उपस्थितांकडून वधवून घेतली. त्यास सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फणसळकर पुढे म्हणाले, वाहतूक पोलीस हे ३६५ दिवस वाहतूकीच्या नियमांचे महत्व सांगत असतात. प्रत्येकाचा जीव मोलाचा आहे. त्यामुळेच वाहन चालकांशी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून विशेष संपर्क अभियान राबविले आहे. त्यासाठी अनेक सोसायटयांमधूनही पोलिसांनी चालकांचे उद्धबोधन केले आहे. मॉल तसेच गर्दीच्या ठिकाणी हेल्मेट परिधान करण्यासह सीट बेल्ट लावणे आणि सिग्नल न तोडण्याबाबत जनजागृती केल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दहा टक्के अपघात कमी करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयास प्रथम पारितोषिक मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येक वाहन चालकाने सजगतेने वाहन चालविल्यास अपघातांवर निश्चित नियंत्रण येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातही पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी कारवायांबरोबर वाहतूकीच्या नियमांची जनजागृती केल्यामुळेच राज्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला अपघाताचे उद्दीष्ट कमी करण्यात प्रथम पारितोषिक मिळाल्याचा दावा केला.
यावेळी राजकुमार गुप्ता, प्रितम चव्हाण, राजाराम कसाळे, मनोहर वसानी, नितीन रोकडे, गिरीश पाटील, राजू पाटील, बाळासाहेब घुले आणि रुपसिंग पुरोहित आदी १८ नागरिकांचा वाहतूक नियमनामध्ये पोलिसांना विशेष मदत केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या नेहा गुप्ता हिने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. नेहा हिच्यासह विविध स्पर्धांमधील पारितोषिक विजेत्यांचा आयुक्तांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, प्रवीण पवार, दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, प्रियंका नारनवरे, अविनाश अंबुरे, सुभाष बुरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, तुकाराम पवळे, सचिन गावडे आणि मनोहर आव्हाड आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होेते.